– सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह प्रियंका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांचे मानले आभार; संघटनात्मक जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार
The Exposer
नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नागपूरचे काँग्रेस नेते इंजि. नितीन मारोतराव कुंभलकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत नव्या जबाबदारीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे सहकोषाध्यक्ष (Joint Treasurer) तसेच मालमत्ता व संपत्ती विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या संघटनात्मक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कुंभलकर यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विशेष आभार मानले. त्यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि काँग्रेसच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे, दूरदृष्टीचे आणि सामाजिक न्याय व संवैधानिक लोकशाहीच्या मूल्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या प्रोत्साहनाबद्दल, तसेच संघटन महासचिव आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दलही कुंभलकर यांनी आभार मानले.
पद नव्हे, तर मोठी जबाबदारी!
या नियुक्तीकडे केवळ सन्मान म्हणून न पाहता एक मोठी जबाबदारी म्हणून स्वीकारत असल्याचे कुंभलकर यांनी स्पष्ट केले. प्रामाणिकपणा, शिस्त, निष्ठा आणि समर्पणाच्या भावनेतून ही जबाबदारी पार पाडण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा समृद्ध वारसा, लोकशाही मूल्ये आणि विचारधारा जपत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले. सर्वसमावेशक, प्रगतिशील आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी पक्षाच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.कुंभलकर यांच्या या नियुक्तीमुळे नागपूरमधील काँग्रेस संघटनेला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले असून, त्यांच्या नव्या जबाबदारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक














