– दोन वर्षांत रजिस्ट्रीचे आश्वासन देत रक्कम उकळली; अंजनी पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून एक-दोन वर्षांत रजिस्ट्री करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, तब्बल ३३ लाख ९१ हजार रुपये स्वीकारल्यानंतरही प्लॉटची रजिस्ट्री करून न देता आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंजनी पोलिसांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार प्रेमचंद गंगाधरप्रसाद तिवारी (वय ६०, रा. प्लॉट क्र. ३३३, धडीवाल ले-आऊट, बेलतरोडी रोड, नागपूर) यांनी मौजा चिमणाझरी येथील मिल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमधील प्लॉट क्रमांक २३, २४, ४५ व ४६, असे एकूण ७,७०० चौरस फुटांचे भूखंड खरेदी करण्याचा व्यवहार केला होता.
या व्यवहारात सोसायटीचे पदाधिकारी आरोपी चंद्रकांत पुलीत बिस्वास (वय ७७), सचिव सविता चंद्रकांत बिस्वास (वय ६८) आणि मिथुन ऊर्फ चंद्रकांत बिस्वास (वय ४८), अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही बॅनर्जी ले-आऊट परिसरातील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२२ फेब्रुवारी २०१८ रोजी तक्रारदारांनी आरोपींना प्लॉट खरेदीच्या व्यवहारापोटी रक्कम दिली होती. त्याबदल्यात आरोपींनी रक्कम मिळाल्याच्या पावत्या तसेच विक्रीकरारनामा करून दिला होता. एवढेच नव्हे, तर तक्रारदारांच्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडूनही रक्कम स्वीकारून त्यांच्यासोबत करारनामे करण्यात आले होते.
एकूण ३३ लाख ९१ हजार रुपये स्वीकारून संबंधित प्लॉटची एक-दोन वर्षांत रजिस्ट्री करून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. मात्र, वारंवार टाळाटाळ करूनही रजिस्ट्री करून देण्यात आली नाही. परिणामी, आरोपींनी विश्वास संपादन करून तक्रारदार व इतरांची एकूण ३३ लाख ९१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची व अर्जाची चौकशी केल्यानंतर अंजनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक मनीष चिलकुलवार यांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८, ३१६(२), ३१४ व ३(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून कडक कारवाई होण्याची शक्यता
प्लॉटच्या नावाखाली लाखोंची रक्कम स्वीकारून वर्षानुवर्षे रजिस्ट्री रखडविण्याच्या या प्रकारामुळे भूखंड खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीचा यापूर्वीचा रेकॉर्ड पोलिसांकडून तपासला जात आहे. त्यामुळे अजनी पोलिसांकडून कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Author: संतोष तायडे
संपादक














