जयंतीनगरी-५ मॉलसमोर रस्त्यावरील अवैध कार पार्किंग स्टँड हटविले; वसुलीच्या अड्ड्याला चाप

– अनेक वर्षांपासूनच्या दिवसभराच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका
– बेसावासीयांना वाहतूक पोलिसांच्या धडक मोहिमेचा दिलासा

The Exposer
नागपूर : शहरातील रस्ते आणि फुटपाथ अडवून ठेवणाऱ्या बेवारस तसेच नादुरुस्त वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फायदा आता बेसा परिसरातील नागरिकांनाही झाला आहे. जयंतीनगरी-५ येथील मॉलसमोरील मुख्य रस्त्यावर थाटण्यात आलेले अवैध कार पार्किंग स्टँड अखेर हटविण्यात आले आहे. या कारवाईमुळे रस्त्यावरच पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वसुली केंद्राला चाप बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

जयंतीनगरी-५ येथील मॉलसमोर कार पार्किंगच्या नावाखाली मुख्य रस्त्यावरच पार्किंग स्टँड उभारण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग वाहनांनी व्यापला जात होता. परिणामी दिवसभर या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. वाहनचालकांसह पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

विशेष म्हणजे, सार्वजनिक रस्त्यावर पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात होता. त्यामुळे मॉलसमोरील रस्ता जणू अवैध पार्किंग आणि वसुलीचा अड्डाच बनला होता. या प्रकारामुळे बेसावासीयांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

दरम्यान, शहर वाहतूक पोलिसांनी रस्ते आणि फुटपाथ अडथळामुक्त करण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत या पार्किंग स्टँडवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील पार्किंग स्टँड हटविल्यानंतर आता पुढील सर्व्हिस रोडवर कार पार्किंगची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला मोकळीक मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

बेसावासीयांकडून वाहतूक पोलिसांचे आभार

जयंतीनगरी-५ मॉलसमोरील रस्त्यावरील पार्किंग स्टँड हटविल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक रस्ता हा नागरिकांच्या वाहतुकीसाठी असताना त्याचा वापर खासगी पार्किंगसाठी कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित होत होता. अखेर वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे या समस्येतून दिलासा मिळाल्याने बेसावासीयांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.

नागरिकांनाही माहिती देण्याचे आवाहन

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. रस्त्यावर किंवा फुटपाथवर अनेक दिवसांपासून बेवारस, भंगार अथवा नादुरुस्त वाहन उभे असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी वाहतूक पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक) आदित्य मिरखेळकर यांनी केले आहे.

यासाठी वाहतूक पोलिसांकडून ९३६६८ ४७३१४ हा संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा वाहनांची माहिती देऊन शहरातील रस्ते आणि फुटपाथ अडथळामुक्त ठेवण्याच्या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहनही मिरखेळकर यांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More