माघार घेतलेल्या प्रा. अनिल सोलेंच्या नावावर २६७ मते! पदवीधर निवडणुकीच्या निकालात आश्चर्याची नोंद

– कराळे मास्तरांना अपक्षांमध्ये सर्वाधिक प्रतिसाद; ३६ उमेदवारांना मिळून ३३ हजारांहून अधिक मते

The Exposer
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारीतून माघार घेऊन भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, माघार घेतल्यानंतरही सोले यांच्या नावावर तब्बल २६७ मते नोंदवली गेल्याने निवडणुकीच्या निकालात या आकडेवारीची विशेष चर्चा होत आहे. सोले हे २०१४ मध्ये आमदार होते. यापूर्वी ते नगरसेवक आणि महापौरही होते, हे विशेष.

या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली. उर्वरित उमेदवारांच्या मतांची आकडेवारीही लक्षवेधी ठरली. उपलब्ध माहितीनुसार, अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या ३६ उमेदवारांना एकत्रितपणे ३३ हजार ३२० मते मिळाली. यामध्ये नितेश कराळे मास्तर यांनी २४ हजार २४९ मते मिळवत अपक्ष उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतसंख्या नोंदवली.

कराळे मास्तरांना सर्वाधिक प्रतिसाद

अपक्ष उमेदवारांच्या मतांची तुलना केल्यास कराळे मास्तर यांची मतसंख्या इतर उमेदवारांच्या तुलनेत मोठी आहे. संजय थुल यांना ३ हजार ९१, सुमेध गडापायले यांना १ हजार ९६, मंगेश वानखेडे यांना १ हजार २९, अतुल देशमुख यांना ९२१, तर धनंजय बोरकर यांना ८४९ मते मिळाली. इतर उमेदवारांची मतसंख्या यापेक्षा कमी राहिली.

काही उमेदवारांना अवघी सात ते २५ मते

निवडणुकीत काही उमेदवारांना अत्यल्प मते मिळाल्याचेही समोर आले आहे. बिपीन रमेश तुपे यांना केवळ सात, प्रज्वल मनोहर गावंडे यांना नऊ आणि नरेश लक्ष्मणराव पिल्लई यांना १३ मते मिळाली. गजानन लोखंडे, पराग भोंगाडे, प्रशांत पिंपळे आणि रघुनाथ सोंटक्के यांना प्रत्येकी १६ मते मिळाली. विनायक आवचट यांना १७, नरेंद्र पाटील यांना १८, तर उत्तमप्रकाश शहारे यांना २५ मते मिळाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण १६ उमेदवारांना ३० पेक्षा कमी मते मिळाली.

माघार, पाठिंबा आणि मतांची नोंद चर्चेत

प्रा. अनिल सोले यांनी माघार घेऊन सुधाकर कोहळे यांना पाठिंबा दिला असतानाही त्यांच्या नावावर २६७ मते नोंदवली जाणे, हा या निवडणुकीतील नोंद घेण्याजोगा तपशील ठरला आहे. पदवीधर मतदारसंघातील पसंतीक्रम पद्धतीच्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मते, पुढील पसंतीनुसार होणारे मतांचे हस्तांतरण आणि अंतिम निकाल यांना महत्त्व असते. त्यामुळे उमेदवारनिहाय मतांची अधिकृत आकडेवारी आणि मतमोजणीची प्रक्रिया यांचा एकत्रित विचार केल्यास निकालाचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे पहाटेपर्यन्त अंतिम निकाल घोषित होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागलें आहे. 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More