डॉक्टर नाही, नर्स नाही; रुग्णालयाची जबाबदारी केवळ सफाई कर्मचाऱ्याच्या भरवशावर?

– नरखेड तालुक्यातील पिपळा केवलरामचा सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेचा बोजवारा

The Exposer
नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, नरखेड तालुक्यातील पिपळा केवलराम येथील शासकीय दवाखान्याची परिस्थिती पाहता शासनाच्या ग्रामीण आरोग्यसेवेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मागील दहा दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, या दवाखान्यात डॉक्टर नाहीत, परिचारिका (नर्स) नाहीत आणि आरोग्यसेवेशी संबंधित अन्य कर्मचारीही उपलब्ध नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दवाखान्यात केवळ साफसफाई करणारी महिला उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. दवाखान्यात कर्मचारी का नाहीत, अशी विचारणा केली असता, मागील दहा दिवसांपासून येथे कोणीही आले नसल्याचे तिने सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपचाराचे महत्त्वाचे ठिकाण असते. अचानक प्रकृती बिघडल्यास किंवा तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास नागरिकांनी नेमके कुठे जावे, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सरकारी दवाखाना असूनही उपचाराची सुविधा मिळत नसेल, तर ग्रामीण जनतेने आरोग्यसेवेसाठी कोणावर अवलंबून राहायचे?

दहा दिवसांपासून दवाखाना बंद असल्याची बाब खरी असेल, तर संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का? डॉक्टर व परिचारिकांची नियुक्ती असताना ते अनुपस्थित का आहेत? पर्यायी वैद्यकीय व्यवस्था का करण्यात आली नाही? तसेच या काळात रुग्णांची गैरसोय झाल्याची जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी!

पिपळा केवलराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून डॉक्टर, परिचारिका व आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी. दहा दिवसांपासून दवाखाना बंद असल्याच्या तक्रारीची चौकशी करून जबाबदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More