– दीक्षाभूमीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद न्यायालयात
– भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची याचिका फेटाळली, न्यायाधिकरणाचा आदेश कायम
The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी फेटाळून लावली. त्यामुळे डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांना प्राचार्यपदी पुन्हा नियुक्त करण्याचा न्यायाधिकरणाचा आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
प्राचार्यपदाच्या या वादात न्यायाधिकरणाने डॉ. दीपा पानेकर यांना पदावरून हटवून डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांची पुन्हा प्राचार्यपदी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. डॉ. मेहरे यांच्या रूपात कॉलेजला कायम स्वरूपी प्राचार्य मिळत असतांना याला विरोध करीत भन्ते ससाई यांनी मात्र आस्थायी, प्रभारी कार्यकारी प्राचार्य पदी डॉ. दीपा पानेकर याच हव्या म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, आज उच्च न्यायालयाने भंते ससाई यांची याचिका फेटाळल्याने त्यांच्या आव्हानाला यश आले नाही. या निकालामुळे डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांचा आणखी दोन वर्षे प्राचार्यपदावर कार्यरत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ उच्च न्यायालयाच्या आदेशातील अटी व निर्देशांच्या अधीन राहणार आहे. या प्रकरणात डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांच्या वतीने ॲड. अक्षय सुदामे यांनी उच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.
डॉ. मेहरे यांचा संघर्ष इतर महिलांसाठी ठरला प्रेरणादायी
डॉ. भुवनेश्वरी मेहरे या उच्चशिक्षित महिलेला सेवाकाळातील वरिष्ठतेनुसार आपल्या हक्काच्या प्राचार्य पदाच्या पदोन्नतीसाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागला, आणि शेवटी उच्च न्यायालयाने सुद्धा डॉ. मेहरे यांचा कायदेशीर संघर्ष बघता न्यायाधीकरणाचा निर्णय कायम ठेवला. यावरुन डॉ. मेहरे यांचा संघर्ष हा इतर महिलांसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरला, हे विशेष.
Author: संतोष तायडे
संपादक















