म्हाडाच्या बांधकाम साइटवर टॉवर क्रेन कोसळली; दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू!

– उत्तर प्रदेश आणि भंडाऱ्यातील क्रेन ऑपरेटरचा मृत्यू; झारखंडचे दोन मजूर गंभीर जखमी – सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

The Exposer
नागपूर : नागपूरच्या शुक्रवार तलाव परिसरातील म्हाडाच्या निर्माणाधीन टेक्सटाइल कमर्शियल पार्कमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बांधकाम साइटवर काम सुरू असताना अचानक टॉवर क्रेन असंतुलित होऊन कोसळली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून, अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या भीषण दुर्घटनेत उत्तर प्रदेशातील मुकेश निषाद आणि भंडारा येथील विश्वनाथ कटाने या दोन क्रेन ऑपरेटरचा मृत्यू झाला. अचानक क्रेन कोसळल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. दरम्यान, झारखंडमधील अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी ओरिएंट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत दोन्ही मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, ही टॉवर क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

तांत्रिक बिघाड की सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष?

टॉवर क्रेन कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड, यंत्रणेतील दोष की बांधकाम साइटवरील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन कारणीभूत ठरले, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. क्रेनची नियमित तपासणी झाली होती का? ऑपरेटरसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था होती का? बांधकामस्थळी कामगारांच्या संरक्षणासाठी निर्धारित नियमांची अंमलबजावणी केली जात होती का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन कुटुंबांचा आधार हिरावला; जबाबदारी निश्चित होणार का?

विकासकामांच्या नावाखाली उभ्या राहणाऱ्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये मजुरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र, टॉवर क्रेनसारखी अवजड यंत्रणा कोसळून दोन कामगारांचा जीव जाणे ही गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची केवळ कारणमीमांसा न करता संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दोन मजुरांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमी मजुरांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. आता या दुर्घटनेच्या तपासातून नेमके सत्य समोर येण्याची आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More