नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद्यांच्या कलेतून साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला! ‘शिव किल्ले स्पर्धा-२०२६’मध्ये बंद्यांच्या कल्पकतेचा आविष्कार

– १० शिक्षाधीन बंद्यांची मेहनत, कलाकौशल्य आणि ऐतिहासिक जाणीवेतून किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती; सुधारणा व पुनर्वसनाचा सकारात्मक संदेश

The Exposer
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आणि स्वराज्याच्या वैभवशाली परंपरेची प्रेरणा घेत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी आपल्या कलाकौशल्यातून ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर यांच्या वतीने आयोजित ‘शिव किल्ले स्पर्धा-२०२६’मध्ये कारागृहातील १० शिक्षाधीन बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या मेहनतीचा आणि कल्पकतेचा अनोखा आविष्कार सादर केला.

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने ‘शिववैभव किल्ले स्पर्धा-२०२५’मध्येही नागपूर मध्यवर्ती कारागृहाने सहभाग नोंदविला होता. त्यावेळी कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला होता. यंदाही स्पर्धेत सहभागी होत बंद्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची देखणी प्रतिकृती साकारत आपल्या कलागुणांची पुन्हा एकदा चुणूक दाखवली आहे.

कारागृह प्रशासनाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला अनुसरून बंद्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत यंदा ‘शिव किल्ले स्पर्धा-२०२६ (किल्ले बनवा, इतिहास जगवा)’मध्ये कारागृहातील १० शिक्षाधीन बंद्यांनी सहभाग घेतला. कागद, माती आणि विविध रंगांच्या साहाय्याने त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची सूक्ष्म तपशीलांसह आकर्षक प्रतिकृती तयार केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६४ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. मालवणजवळ अरबी समुद्रातील कुरटे बेटावर उभारलेला हा जलदुर्ग मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे आणि सागरी संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारताना बंद्यांनी केवळ कलाकृती निर्माण केली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि ऐतिहासिक वारसा नव्या दृष्टिकोनातून अनुभवला.

या उपक्रमामुळे बंद्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलले असून, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले आहे. कारागृहातील वातावरणातही इतिहास, कला आणि देशभक्तीची भावना जागृत करणारी ही निर्मिती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे.

कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, कारागृहातील प्रत्येक बंद्यामध्ये काही ना काही सुप्त गुण, कला आणि कौशल्य दडलेले असते. त्याला योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास सकारात्मक परिवर्तन घडू शकते. अशा स्पर्धांच्या माध्यमातून बंद्यांना त्यांच्या कल्पकतेला वाव देण्याची आणि कलागुण सादर करण्याची संधी मिळते. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, कौशल्य विकसित होते आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुनर्स्थापित होण्याच्या प्रवासाला बळ मिळते. बंद्यांची सुधारणा आणि पुनर्वसन हेच कारागृह प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महासंचालक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कारागृह अधीक्षक वैभव आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा वैभव आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे, मनोहर भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तुरुंगाधिकारी तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य लाभले.

शिवाय शिपाई हेमंत खैरे, शिपाई रोहन बच्चाव आणि बेकरि निदेशक यांनी विशेष पुढाकार घेत बंद्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळे बंद्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची आणि ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याची संधी उपलब्ध झाली.

सकारात्मक विचारांना नवे आकाश

कारागृहाच्या भिंतीआडही कल्पकता, मेहनत आणि सकारात्मक विचारांना नवे आकाश मिळू शकते, याचा प्रत्यय सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या प्रतिकृतीतून आला आहे. शिक्षा भोगण्यासोबतच स्वतःमधील कौशल्य ओळखून नव्या आयुष्याची उभारणी करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरतो.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More