– अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन, तर वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; महिला पोलीस पथकाची धडक कारवाई
The Exposer
नागपूर : गंगा-जमुना परिसरातील अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासह सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी लकडगंज पोलिसांनी विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व इशारे करून ग्राहकांना आकर्षित केल्याचा आरोप असलेल्या सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर अनधिकृतपणे ऑटो उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस ठाणे लकडगंजच्या हद्दीतील गंगा-जमुना सिमेंट रोड आणि आतील परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास ही विशेष मोहीम राबविण्यात आली. परिसरातील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांना वाहतुकीच्या समस्येतून दिलासा देणे, हा या मोहिमेमागील उद्देश होता. यासाठी महिला पोलीस अंमलदार आणि विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व इशारे करून ग्राहकांना आकर्षित करताना आढळलेल्या सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) कलम ७ व ८ अंतर्गत अपराध क्रमांक ८४१/२०२६, ८४२/२०२६ आणि ८४३/२०२६ असे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
रस्त्यावर ऑटो उभे करणाऱ्यांवरही कारवाई
गंगा-जमुना सिमेंट रोडवर अनधिकृतपणे ऑटो उभे करून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवरही पोलिसांनी कारवाई केली. अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये अपराध क्रमांक ८३९/२०२६ आणि ८४०/२०२६ यांचा समावेश आहे.
महिला पोलीस अंमलदारांसह विशेष पथकाचा सहभाग
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कारवाईत महिला पोलीस अंमलदार रूपाली सोनवणे, सुकेसनी घोरले, सरिता बगिले, संगीता कोल्हे, इमला बेंद्रे, पुनम मडावी, कल्याणी नाणे, भावना आणि मंजुषा यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस हवालदार आनंद मरसकुल्ले, नरेंद्र गिरडे, प्रवीण डाबरे, कार्तिक मडगुलवार, निलेश चौधरी, गणेश गिरी आणि अनिल महतो यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
पाच गुन्हे दाखल; मोहिमा सुरूच राहणार
या विशेष मोहिमेत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा महिलांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), पोलीस उपायुक्त (परिमंडळ क्रमांक ३) आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
गंगा-जमुना परिसरातील अनैतिक कृत्ये, सार्वजनिक ठिकाणांवरील गैरप्रकार, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बाबी आणि असामाजिक तत्त्वांविरुद्ध यापुढेही सातत्याने विशेष मोहिमा राबवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक














