रामकिशन ओझा यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती

The Exposer
नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) वतीने जाहीर करण्यात आलेल्या सचिवांच्या नियुक्त्यांमध्ये नागपूरचे रामकिशन ओझा यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओझा यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

रामकिशन ओझा हे गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करून त्यांनी प्रदेश काँग्रेसपर्यंत विविध स्तरांवर काम केले आहे. पक्ष संघटनेतील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे.

ओझा यांनी यापूर्वी गुजरातचे प्रभारी सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत होते. या काळात पक्ष संघटनेच्या विविध कामांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला.

राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आता सचिवपदाच्या नव्या जबाबदारीतून ओझा यांच्याकडून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी योगदान दिले जाणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More