अवघ्या पाच तासांत घरफोडीचा छडा; दोन आरोपी अटकेत!

– कळमना पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू

The Exposer
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या पाच तासांत छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसऱ्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम नगर, सीताराम किराणा दुकानाजवळ राहणारे फिर्यादी निशांत अरुण भाटी (वय ३६) हे १३ नोव्हेंबर २०२६ रोजी कुटुंबासह देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेले होते. १७ नोव्हेंबर रोजी घरी परतल्यानंतर घराच्या कुलपात बदल झाल्याचे आणि कुलूप उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, दोन चेन, एक अंगठी, मालमत्तेची कागदपत्रे तसेच चारचाकी वाहनाची चावी असा एकूण ३ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींची ओळख पटली

गुन्ह्याची माहिती मिळताच कळमना पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. १५ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास दोन संशयितांची हालचाल सीसीटीव्हीमध्ये आढळून आली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

यामध्ये गौरव सचिन पालीवाल (वय १९) आणि देवेंद्र ऊर्फ दादू किशोरीलाल शाह (वय २१), दोघेही रा. ओम नगर, तलमले लेआउट, सीताराम किराणा दुकानाजवळ, कळमना, यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

गुन्ह्याची कबुली; २.५० लाखांचे दागिने जप्त

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी त्यांचा तिसरा साथीदार वेदप्रकाश ऊर्फ छोटू बळेश्वर दास (रा. जाम नगर, भरतवाडा, कळमना) याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

१८ नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींकडून चोरीच्या मुद्देमालापैकी ४८.५५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, अंदाजे २ लाख २५ हजार रुपये किमतीचा, तसेच कानातील ३.९४० ग्रॅम वजनाचे झुमके, अंदाजे २५ हजार रुपये किमतीचे, असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या विरोधात यापूर्वीही घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) करीम पठाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत यांच्यासह पोलीस अंमलदार प्रमोद कांगले, विशाल भैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश ग्वालवंशी, रोशन निबेते, प्रवीण इनवाते आणि परिमंडळ क्रमांक ५ च्या पथकाने सहभाग घेतला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More