CCTV फुटेजच्या आधारे वाहन चोराचा शोध; दोन दुचाकी जप्त!

– कळमना पोलिसांची कामगिरी; ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, २२ वर्षीय आरोपीला अटक

The Exposer
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करीत एका २२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत ४५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शोएब खान तज्जमुल खान (वय २२, रा. पर्वती नगर, कळमना गाव, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १०९०/२०२६ मधील फिर्यादीने आपली हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH 49 L 6819) घरासमोर उभी केली होती. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीचा तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील तब्बल २० ते २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर मिळून आली. पुढील तपासादरम्यान त्याने दुसऱ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचीही माहिती दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ८८१/२०२६ मधील चोरीची टीव्हीएस रेडिऑन दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.

या कारवाईत काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (किंमत अंदाजे १५ हजार रुपये) आणि लाल रंगाची टीव्हीएस रेडिऑन (किंमत अंदाजे ३० हजार रुपये), अशा एकूण ४५ हजार रुपयांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अजय जाधव तसेच पोलीस हवालदार रवीकुमार शाहू, प्रदीप पवार आणि पोलीस अंमलदार मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव व प्रफुल गोहकार यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More