– मिरची, हळद, धने पावडरसह मक्याच्या बेसनात भेसळ; १,१६,५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त, पिता–पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर / नवीन कामठी : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी भेसळयुक्त अन्नपदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध नवीन कामठी पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत भेसळयुक्त मिरची पावडर, धने पावडर, मक्याचे बेसन आणि हळद पावडरचा साठा उघडकीस आला. या प्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण १ लाख १६ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेसळयुक्त अन्नपदार्थांची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी आणि नवीन कामठी पोलिसांच्या संयुक्त पथकाने हद्दीतील संबंधित दुकानाची तपासणी केली.
यावेळी दुकानमालक योगेंद्र नरेंद्र केसवाणी (वय ३३) याला दुकानातील अन्नपदार्थांच्या विक्रीचा परवाना विचारण्यात आला. मात्र, त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दुकानाची झडती घेतली असता मिरची पावडर, धने पावडर, मक्याचे बेसन आणि हळद पावडर या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचे तपासणीत आढळून आले.
हे पदार्थ मानवी आरोग्यासाठी हानिकारक आणि अपायकारक असल्याची माहिती असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची भेसळ करून उत्पादन व विक्रीसाठी साठवणूक करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले. या कारवाईत एकूण १,४७१.०५ किलो ग्रॅम भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख १६ हजार ५०४ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात दुकानमालक योगेंद्र केसवाणी याच्यासह त्याचे वडील नरेंद्र राधेश्याम केसवाणी (वय ६६) हेही व्यवसायात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता शाहू, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठी विभागातील पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
ग्राहकांच्या ताटात विषारी भेसळ?
मसाल्यांच्या नावाखाली भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ हा केवळ आर्थिक फसवणुकीचा प्रकार नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याबरोबरच संबंधित अन्नपदार्थांचा पुरवठा आणि विक्री साखळीचाही तपास होणे आवश्यक आहे.
Author: संतोष तायडे
संपादक














