संविधान दिनानिमित्त नागपुरात तीन दिवस वैचारिक मेजवानी!

– कन्हैया कुमार, डॉ. शरद बाविस्कर, ऍड. संघराज रूपवते आणि दीपा पवार यांची प्रमुख उपस्थिती; २६, २८ व २९ नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन

The Exposer
नागपूर : संविधान दिनाचे औचित्य साधून नागपुरात तीन दिवसांचा भव्य संविधान दिवस समारोह आयोजित करण्यात आला आहे. संविधान दिवस समारोह समितीच्या वतीने २६, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नरेंद्रनगर येथील मैदानावर विविध वैचारिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाच्या समारोहाचे मुख्य आकर्षण म्हणजे युवानेते कन्हैया कुमार, दिल्लीचे डॉ. शरद बाविस्कर, मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. संघराज रूपवते आणि संशोधक व लेखिका दीपा पवार यांची उपस्थिती. संविधानाचे महत्त्व, सद्यस्थितीतील आव्हाने, नागरिकत्व, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि वंचित घटकांचे सामाजिक उत्थान अशा महत्त्वपूर्ण विषयांवर हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

२९ नोव्हेंबरला दिवसभर चर्चासत्रांची मेजवानी

रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता चर्चासत्रांच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होईल. या सत्रात मुंबईच्या संशोधक व लेखिका दीपा पवार या ‘संविधान भटके-विमुक्तांच्या उत्थानाचा मार्ग’ या विषयावर, तर मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. संघराज रूपवते हे ‘एसआयआर आणि भारतीय नागरिकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या सत्राचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते होणार असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विकास जांभूळकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

दुसऱ्या चर्चासत्रात युवानेते कन्हैया कुमार हे ‘संविधानावर कुठाराघात आणि युवकांचा आक्रोश’ या विषयावर, तर दिल्लीचे डॉ. शरद बाविस्कर हे ‘संविधान विरुद्ध सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या चर्चासत्राचे अध्यक्षपद डॉ. जोगेंद्र गवई भूषविणार आहेत.

२६ नोव्हेंबरला संविधान सन्मान रॅली

संविधान दिनाच्या दिवशी, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर संविधान जागर पथनाट्य आणि गीतगायनाच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे.

२८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान परीक्षा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, परिसंवाद, वेशभूषा आणि नाट्यछटा अशा विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

संविधानिक मूल्यांच्या जागरासाठी व्यापक सहभागाचे आवाहन

संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा समाजात प्रसार व्हावा, तसेच नव्या पिढीला संविधानाच्या विचारांशी जोडता यावे, या उद्देशाने या समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय समारोहात नागरिक, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख समन्वयक डॉ. सरोज प्रदीप आगलावे, स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत कडू (माजी अधिष्ठाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), प्रा. घनश्याम धाबर्डे, सुधाकर दुबे, नरेंद्र ताकसांडे, डॉ. सरोज डांगे आणि देवांगिनी कांबळे यांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More