अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी; ८० सामाजिक संघटनांचा सहभाग
The Exposer
नागपूर : शासनाच्या कथित आरक्षणविरोधी धोरणांचा निषेध आणि अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या १० डिसेंबर रोजी नागपुरात भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा हा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात सुमारे ७ लाख नागरिक सहभागी होतील, असा दावा ‘आरक्षण बचाव उपवर्गीकरण हटाव संघर्ष समिती’ने केला आहे. रविवारी (२२ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली.
शिक्षण, रोजगार आणि पदोन्नतीच्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार
पत्रकार परिषदेत शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षणाचे खासगीकरण, शाळा बंद करण्याचे धोरण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणे आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी निर्माण होणे, यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला.
राज्यात सुमारे ३ लाख ८० हजार पदे रिक्त असतानाही भरती प्रक्रिया रखडली आहे. दुसरीकडे, कंत्राटी पद्धतीने आणि आऊटसोर्सिंगद्वारे नियुक्त्या केल्या जात असल्याने मागासवर्गीय तरुणांच्या रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याचा आरोप
शासकीय सेवांमधील पदोन्नतीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीवरही समितीने प्रश्न उपस्थित केले. मनमानी पद्धतीने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्यामुळे सुमारे ६० हजार अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिल्याचा दावा करण्यात आला. ही परिस्थिती आरक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली.
उपवर्गीकरण रद्द करण्याची प्रमुख मागणी
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समितीने तीव्र आक्षेप नोंदवला. माजी न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून ५९ जातींचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का बसू शकतो, अशी भूमिका समितीने मांडली.
आंदोलनात ८० संघटनांचा सहभाग
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्यासह सुमारे ८० सामाजिक, विद्यार्थी आणि कामगार संघटनांच्या सहभागातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ या निर्धाराने नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीने केले.
पत्रकार परिषदेला प्रा.देविदास घोडेस्वार,अरुण गाडे, पद्माकर गणवीर, प्रा. राहुल मुन, छायाताई खोब्रागडे, विनोद मेश्राम, राजेश डेंगरे, मच्छिंद्र सावळे, घनश्याम फुसे, राजाराम कुंभारे आणि ज्ञानेश्वर काकडे आदी उपस्थित होते.
Author: प्रमोद गणवीर
पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर














