‘वेगाचा कहर’; आधी दुभाजकाला, नंतर उभ्या ट्रकवर आदळली कार

– दोन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर, १७ वर्षीय अल्पवयीनाच्या हातात कारची स्टेअरिंग

The Exposer
नागपूर : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांचा आनंदाचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत काळरात्र ठरला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम रस्ता दुभाजकाला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही थरारक घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा बायपासवर घडली. मृतांची ओळख सुभाषनगर येथील मिहिर आनंद बेहार (१७) आणि पारडी येथील सागर संजय मेलवाणी (१७) अशी झाली आहे. तर भौमिक अमोल लारोकार (१८) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपूर्वीच काळाचा घाला

मिहिर, भौमिक आणि सागर हे तिघेही त्यांचा मित्र जय याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले होते. जयला भरतवाडा चौकाजवळ बोलावण्यात आले होते. तो येण्यास वेळ असल्याने तिघांनी कारमधून फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा फेरफटका आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला. प्राप्त माहितीनुसार, तिघे एमएच ४९ सीएस ०४२७ क्रमांकाच्या कारमधून निघाले होते. कार मिहिर चालवत होता, तर भौमिक आणि सागर मागील सीटवर बसले होते.

आधी दुभाजकाला धडक, नंतर ट्रकवर आदळली कार

भरतवाडा बायपासजवळ कार भरधाव वेगात असताना मिहिरचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नियंत्रण सुटलेल्या कारने सर्वप्रथम रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीजी ०४ एमसी २९८१ क्रमांकाच्या ट्रकवर मागून जाऊन आदळली. ट्रकला झालेल्या जोरदार धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी तातडीने बाहेर काढले

अपघाताची माहिती मिळताच कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मिहिर आणि सागर यांना मृत घोषित केले. भौमिकवर उपचार सुरू आहेत.

स्टंटबाजीच्या दिशेनेही तपास?

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे. भरधाव कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला आणि त्यानंतर उभ्या ट्रकला धडकताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारचा वेग किती होता, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि अपघातापूर्वी कारमध्ये स्टंटबाजी किंवा अन्य प्रकार सुरू होता का, या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करीत आहेत.

अल्पवयीनाच्या हातात कारची स्टेअरिंग कशी?

या अपघातानंतर सर्वाधिक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे १७ वर्षीय अल्पवयीनाच्या हातात कारची स्टेअरिंग आलीच कशी? प्राथमिक माहितीनुसार मिहिरकडे कार चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तरीही तो कार चालवत होता.

अल्पवयीन मुलाला कार कोणी दिली, त्याला वाहन चालविण्याची परवानगी कोणी दिली आणि वाहनाच्या चाव्या त्याच्या हातात कशा गेल्या, याचा तपास कळमना पोलीस करीत आहेत.

कार देणाऱ्या वडिलांवरही कारवाईची तयारी

पोलिसांच्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी मिहिरने वडिलांकडून कार मागितली होती. कार उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणात मिहिरच्या वडिलांची भूमिका तपासली जात आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देण्याच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

तिघेही ११वीतील विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढदिवसाच्या आनंदासाठी सुरू झालेला प्रवास दोन कुटुंबांसाठी कायमचा दुःखद अध्याय ठरला.अल्पवयीनांच्या हातात वाहन देणे आणि बेदरकार वेगाने वाहन चालविण्याचे हे प्रकरण पुन्हा एकदा पालकांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More