– एसीपी नरेंद्र हिवरे यांच्यासह तपास पथकाला प्रशस्तीपत्र; सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा घेतला माग
The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन किशोरीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपी निर्मय पाखरे याला तातडीने जेरबंद करून किशोरीची सुखरूप सुटका करणाऱ्या पोलिस पथकाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्यासह तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

प्रकरणाची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांनी तपास पथकाची नियुक्ती करून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाला वेग दिला. सायबर पोलिस सेलच्या मदतीने आरोपीच्या मोबाइल लोकेशनसह विविध तांत्रिक बाबींची बारकाईने पडताळणी करण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचवेळी त्याच्या ताब्यात असलेल्या किशोरीचीही सुरक्षित सुटका करण्यात आली.

आरोपीला जेरबंद करण्यात एएसआय दीपक मोरे, महिला पोलिसकर्मी प्रज्वल वाणी, दिनेश गडेकर तसेच सायबर सेलचे हिमांशू पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पोलिस भवनात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एसीपी नरेंद्र हिवरे आणि तपास पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पथकाच्या कार्याचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले.
Author: संतोष तायडे
संपादक










