अखेर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतली दखल! १० लाखांच्या सोन्याच्या चोरीचा तपास पोलीस उपायुक्तांकडे

– FIR साठी वरिष्ठांकडे धाव घेतलेल्या ज्येष्ठ महिलेच्या तक्रारीनंतर हालचाली; पोलिसांवरील गंभीर आरोपांच्या चौकशीकडे लक्ष

The Exposer
नागपूर : घरातून अंदाजे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तक्रारदार ज्येष्ठ महिला लता दुबे यांच्या तक्रारीची अखेर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्तांकडे (परिमंडळ क्रमांक २) सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध लागणार का, तसेच तक्रारदार महिलेने पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या घरातून कपाटाचे कुलूप तोडून अंदाजे १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी लता दुबे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, तक्रार देऊनही एफआयआर नोंदविण्यास विलंब करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दागिने परत मिळविण्यासाठी एक लाखांची मागणी?

या प्रकरणात डी.बी. स्क्वॉडच्या कथित पैशांच्या मागणीचाही गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये मागण्यात आल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. त्यांचे नातेवाईक दिनेश शर्मा यांच्याकडे ही रक्कम मागितल्याचे पोलिस असयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे.

एफआयआरसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव

तक्रारदार महिलेने वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील सिंग पवार यांच्याकडे १३ ऑक्टोबर रोजी धाव घेतल्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतरही चोरीच्या तपासाबाबत समाधानकारक प्रगती झाली नसल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर केली. आता पोलीस आयुक्तांनी दखल घेत तपास पोलीस उपायुक्तांकडे सोपविल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आता तपासात कोणते मुद्दे स्पष्ट होणार?

या प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. चोरीला गेलेले दागिने अद्याप हस्तगत झाले आहेत का? एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला? एक लाख रुपयांच्या कथित मागणीमध्ये तथ्य आहे का? तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि डी.बी. स्क्वॉडच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणार का? केवळ चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणेच नव्हे, तर तक्रारदार महिलेने उपस्थित केलेल्या आरोपांचीही निष्पक्ष पडताळणी होणे आवश्यक आहे.

१० लाखांचे सोने मिळणार का? वरिष्ठांच्या तपासाकडे लक्ष

एका ज्येष्ठ महिलेच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने चोरीला जाणे आणि त्यानंतर तपासाबाबत गंभीर तक्रारी समोर येणे, ही बाब निश्चितच लक्षवेधी आहे. पोलीस आयुक्तांच्या दखलीनंतर पोलीस उपायुक्तांच्या स्तरावर तपास होत असल्यास चोरीचा छडा लावण्याबरोबरच पोलिसांवरील आरोपांची सत्यताही स्पष्ट होणे अपेक्षित आहे. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांची तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More