फरार ड्रग्ज तस्कर फुल्लीच्या अटकेनंतर आता ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यापर्यंत पोहोचणार का पोलीस?

– गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांच्यासमोर तस्करीच्या मूळ पुरवठा साखळीचा छडा लावण्याचे आव्हान; ड्रग्जचा पुरवठादार कोण, निर्मिती नेमकी कुठे?

The Exposer
नागपूर : शहरात अमली पदार्थ तस्करांविरुद्ध सातत्याने कारवाया होत असल्या, तरी ड्रग्जचा मूळ पुरवठादार कोण, त्याची निर्मिती नेमकी कुठे होते आणि नागपूरपर्यंत अमली पदार्थ पोहोचविणारी पुरवठा साखळी कोण चालवते, असे महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांनी यापूर्वीही शहरातील ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाया केल्या आहेत. आता कुख्यात ड्रग्ज तस्कर विशाल गुप्ता ऊर्फ फल्ली याच्यासह त्याच्या मैत्रिणीला रामेश्वरम परिसरातून अटक करण्यात आल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवून ड्रग्जच्या मूळ स्रोतापर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

किरकोळ तस्करांना अटक; मात्र बड्या पुरवठादारांचे काय?

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर परिसरातील विजया अपार्टमेंटमध्ये छापा टाकून पोलिसांनी फुल्लीच्या टोळीतील पाच जणांना अटक केली होती. या कारवाईत सुमारे दीड कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून फल्ली आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली.

मात्र, स्थानिक तस्करांना अटक करूनच ड्रग्जचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात विक्रीसाठी येणाऱ्या अमली पदार्थांचा पुरवठा कोण करतो? या व्यवहारामागे मोठे वितरक किंवा संघटित टोळी कार्यरत आहे का? स्थानिक तस्करांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचणार का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

ड्रग्ज निर्मितीचा कारखाना नागपुरात की राज्याबाहेर?

एमडी ड्रग्जची निर्मिती नागपूर किंवा आसपासच्या परिसरात होते की महाराष्ट्राबाहेरील कारखान्यांतून त्याचा पुरवठा केला जातो, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ड्रग्जचा मूळ स्रोत, पुरवठ्याचे मार्ग, आर्थिक व्यवहार आणि या अवैध व्यवसायामागील सूत्रधारांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यापूर्वी केलेल्या कारवायांच्या पुढील टप्प्यात आता पुरवठा साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्यावर भर देणे महत्त्वाचे ठरणार आहे. फल्ली आणि त्याच्या साथीदारांच्या चौकशीतून ड्रग्ज निर्मितीच्या ठिकाणाबाबत किंवा मुख्य पुरवठादारांबाबत ठोस धागेदोरे मिळतात का, हे पाहावे लागेल.

अटकेपलीकडे जाऊन नेटवर्क उद्ध्वस्त होणार का?

ड्रग्ज तस्करीविरोधातील कारवाईचे खरे यश केवळ आरोपींच्या अटकेत नसून अमली पदार्थांचा पुरवठा करणारी संपूर्ण साखळी उघड करण्यात आहे. ड्रग्ज कुठून येते, त्यासाठी पैसा कोण पुरवतो, शहरात त्याचे वितरण कोण करते आणि या व्यवसायामागील प्रमुख सूत्रधार कोण आहेत, याचा तपासातून उलगडा होणे गरजेचे असल्याचे म्हटले जाते.

फल्लीच्या अटकेनंतर आता तपासाची दिशा ड्रग्जच्या मूळ स्रोताकडे वळणार का? नागपूरला अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या बड्या तस्करांपर्यंत आणि निर्मितीच्या कारखान्यापर्यंत पोलीस पोहोचणार का? या प्रश्नांची उत्तरे आगामी तपासातूनच स्पष्ट होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलें आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More