– गेल्या वर्षीच्या ५ लाखांच्या तुलनेत यंदा गर्दीत मोठी वाढ; १,२०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात, ५० पेक्षा अधिक AI कॅमेऱ्यांतून देखरेख
The Exposer
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर यंदा सुमारे १२.७ लाख अनुयायी दाखल झाल्याची माहिती नागपूर शहर पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी ही संख्या सुमारे ५ लाख होती. यंदा अनुयायांच्या संख्येत सुमारे ७.७ लाखांची वाढ झाल्याने गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षा राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या व्यापक बंदोबस्तात मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध पथकांमधील समन्वयावर भर देण्यात आला.
१,२०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात
नागपूर शहर पोलीस, परिमंडळ-१ यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दीक्षाभूमी परिसरात २ पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, १०० पोलीस अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलासह १,१०० पोलीस कर्मचारी तैनात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले.
५० पेक्षा अधिक AI कॅमेऱ्यांतून गर्दीवर नजर
प्रवेशद्वारे, पोहोच रस्ते, मंच परिसर, मैदाने, स्टॉल आणि वाहनतळ येथे ५० पेक्षा अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कॅमेरे बसविण्यात आले होते. रिअल-टाइम गर्दी घनता हीटमॅप आणि प्रवेशद्वारांवरील मोजणीद्वारे गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, २० ऑक्टोबरच्या रात्री ९ ते ११ या दोन तासांत सुमारे १.०५ लाख लोकांनी प्रवेश केला. त्यापैकी महिला अनुयायांचे प्रमाण सुमारे ४५ टक्के होते.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था
प्रवेशद्वारांवर बॅरिकेडिंग, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन मार्ग आणि रंगांच्या माध्यमातून दिशादर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने (BDDS) कार्यक्रमस्थळ, पोहोच मार्ग आणि वाहनतळांची सातत्याने तपासणी केली. गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची तैनाती करण्यात आली होती.
मोबाइल चोरीच्या तक्रारींमध्ये घट
यंदा मोबाइल चोरीच्या ६६ तक्रारी नोंदविण्यात आल्या, तर गेल्या वर्षी ही संख्या सुमारे २०० होती. चोरीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली.
६५४ हरवलेल्या व्यक्तींचा शोध
गर्दीत हरवलेल्या सुमारे ६५४ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये १८ वर्षांखालील ६४ मुलांचा समावेश होता. उद्घोषणा व्यवस्था, क्षेत्रीय पथके आणि सीसीटीव्हीच्या मदतीने हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
पोलीस आयुक्तांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक
दीक्षाभूमीवरील लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन करताना सुरक्षा, वाहतूक आणि नागरिकांना मदत या बाबींचा समन्वय साधणे आवश्यक होते. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि क्षेत्रीय पथकांचे समन्वित प्रयत्न उल्लेखनीय ठरले. तर शांततेत पार पडलेला कार्यक्रम बघता नागरिक आणि अनुयायांनी दिलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांनी आभार मानले. दुसरीकडे, वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी परिश्रम घेतलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक














