नागपुरात एमडी ड्रग्जचा कोट्यवधींचा साठा उघड! फल्ली गँगवर गुन्हे शाखेचा मोठा प्रहार

– बेलतरोडीतील फ्लॅटवर मध्यरात्री छापा; १.४०५ किलो एमडीसदृश पदार्थासह १.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात

The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर परिसरात रिंग रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ असलेल्या विजया अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी १ किलो ४०५ ग्रॅम एमडीसदृश पावडर आणि वाहने, मोबाईलसह एकूण १ कोटी ५४ लाख ५० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच आरोपीना जणांना ताब्यात घेण्यात आले असून, कुख्यात आरोपी विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याच्यासह अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे.

गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री धडक कारवाई

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने २४ ऑक्टोबर रोजी बेलतरोडी परिसरातील संबंधित फ्लॅटवर कारवाई केली. या ठिकाणी पाच जणांच्या ताब्यात एमडीसदृश पदार्थ आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायदा, १९८५ च्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

१.४० कोटींचा एमडीसदृश पदार्थ; वाहने आणि रोकडही जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालामध्ये १ किलो ४०५ ग्रॅम एमडीसदृश पावडर, सहा अँड्रॉइड मोबाईल फोन, एक व्हर्ना चारचाकी, चार दुचाकी, इलेक्ट्रिक वजनकाटा, स्काय बॅग आणि ३ लाख ४४ हजार ७०० रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. एमडीसदृश पदार्थाची अंदाजे किंमत १ कोटी ४० लाख ५० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर मुद्देमालासह एकूण जप्तीची किंमत १ कोटी ५४ लाख ५० हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पाच जण पोलिसांच्या ताब्यात

या कारवाईत पोलिसांनी खालील पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अनिकेत ऊर्फ अन्नू संजय बिहारे (वय १९), रा. भांडेवाडी, नागपूर, शुभम ऊर्फ डोरेमॉन दिलीप नरवरिया (वय ३१), रा. दिवाण लेआउट, मानेवाडा, नागपूर, कृष्णा सुनील वर्मा (वय १९), रा. गणेश पेठ, नागपूर, तुफानसिंग बालूसिंग सिसोदिया (वय ३८), रा. राजस्थान, राहुल रामकुमार गोंड (वय ३२), रा. वाठोडा, नागपूर यांचा समावेश आहे. यातील अनिकेत बिहारे हा मकोका प्रकरणात फरार होता, हे विशेष.

विशाल ऊर्फ फल्लीसह तिघांचा शोध

या प्रकरणात विशाल ऊर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता, राजस्थानमधील भूपेंद्रसिंग नावाचा इसम आणि सहेली पंधराम यांचा शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत म्हटले आहे. विशाल ऊर्फ फल्ली हा रेकॉर्डवरील आरोपी आहे.

अमली पदार्थांच्या नेटवर्कचा तपास महत्त्वाचा

या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचा नेमका प्रकार, त्याचा पुरवठा कुठून झाला, या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे आणि जप्त वाहने व रोकड यांचा कथित अमली पदार्थांच्या व्यवहाराशी काय संबंध आहे, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More