पाचपावली पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू होता अवैध कॅसिनो?

– गुन्हे शाखेच्या छाप्यानंतर खळबळ; डीबी पथकाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
– आठ कॅसिनो मशीनसह ३.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त; सहा जण ताब्यात, दोन कथित भागीदारांचा शोध सुरू

The Exposer
नागपूर : शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅसिनो मशीनच्या माध्यमातून लाखोंचा जुगार सुरू असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या छाप्यात उघडकीस आला. शोभाखेत परिसरातील लालबहादूर शास्त्री उद्यानासमोरील एका दुकानात सुरू असलेल्या या कथित अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई करून पोलिसांनी आठ कॅसिनो मशीनसह तब्बल ३ लाख २६ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन कथित भागीदारांचा शोध सुरू आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, हे विशेष.

मात्र, या कारवाईनंतर आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे—पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतक्या उघडपणे कॅसिनो चालत असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती का? माहिती होती, तर वेळीच कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. स्थानिक पोलीस आणि संबंधित डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

स्थानिक पोलिसांच्या नजरेआड जुगाराचा अड्डा कसा?

शोभाखेतसारख्या वस्तीच्या परिसरात दुकानातून कॅसिनो मशीनच्या माध्यमातून जुगार चालवला जात होता. या ठिकाणी ग्राहक येत होते, पैशांची देवाणघेवाण होत होती आणि ऑनलाइन पेमेंटची साधनेही वापरली जात असल्याचे कारवाईत समोर आले.

अशा प्रकारचा व्यवसाय किती काळापासून सुरू होता, त्याची माहिती परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना होती का, नियमित गस्तीच्या वेळी हा प्रकार लक्षात कसा आला नाही आणि यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या का, याचा तपास होणे गरजेचे आहे. अवैध धंदे सुरू राहतात आणि कारवाई मात्र बाहेरील पथकाच्या छाप्यानंतरच होते, अशी परिस्थिती असेल तर स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र, पोलिसांचा आशीर्वाद किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा निष्कर्ष अधिकृत तपासातूनच स्पष्ट होऊ शकतो.

डीबी पथकाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात?

पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती गोळा करणे आणि गुन्हे उघडकीस आणणे ही संबंधित यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत कॅसिनो सुरू असताना स्थानिक डीबी पथकाला त्याची माहिती होती की नव्हती, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

डीबी पथकाला माहिती असूनही कारवाई झाली नसेल, तर त्यामागचे कारण काय? माहितीच नसेल, तर गुप्त माहिती संकलन आणि स्थानिक गुन्हेगारीवर देखरेख ठेवण्याच्या यंत्रणेत त्रुटी आहेत का? या प्रश्नांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करणे आवश्यक आहे.

आठ मशीन, ऑनलाइन पेमेंटची साधने; ३.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या वाहनचोरीविरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता छापा टाकण्यात आला. या कारवाईत साहिल शेख शाकीर शेख (२३), शुभम प्रकाशराव कोठाळे (३१), संतोष तेजराम मेश्राम (३१), शादाब शेख मोहम्मद हुसैन (५०), कुलदीप जगदीश तांबे (२७) आणि राजेश वसंतलाल कैथवास (५२) यांना पकडण्यात आले.

पोलिसांनी आठ कॅसिनो मशीन, ८,९१५ रुपये रोख, तीन मोबाइल फोन, मॉनिटर, माऊस, की-बोर्ड, पेटीएम व यूपीआय पेमेंट मशीन, वाय-फाय उपकरणे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख २६ हजार ७१५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

भागीदारीत कॅसिनो चालत असल्याची माहिती; दोन जणांचा शोध

पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल शेख याने चौकशीदरम्यान महाल येथील सागर धनजोडे आणि मानकापूर परिसरातील बोखारा येथील फिरोज खान यांच्यासोबत भागीदारीत कॅसिनो चालवत असल्याचे सांगितले. या दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आता या कथित भागीदारीमागे आणखी कोणाचा सहभाग होता का, आर्थिक व्यवहार कसे होत होते, कॅसिनो किती काळापासून सुरू होता आणि संबंधित ठिकाणी यापूर्वी तक्रारी आल्या होत्या का, हे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. या प्रकरणात केवळ सहा जणांना पकडून आणि साहित्य जप्त करून तपास संपता कामा नये. अवैध कॅसिनो सुरू राहण्यामागील संपूर्ण यंत्रणा उघड करण्यासाठी पुढील मुद्द्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

कॅसिनो किती दिवसांपासून सुरू होता?

पाचपावली पोलीस ठाणे आणि डीबी पथकाला याची पूर्वकल्पना होती का?, यापूर्वी या ठिकाणाबाबत तक्रारी किंवा गोपनीय माहिती मिळाली होती का?, एवढेच नव्हे तर पाचपावली हद्दीत यापूर्वीही एका कॅसिनो क्लबवर कारवाई करण्यात आली होती, असे असूनही हा क्लब कुणाच्या संरक्षणात सुरु झाला? आजवर याला अभय कुणी दिले?, कॅसिनोच्या आर्थिक व्यवहारांची आणि कथित भागीदारांच्या भूमिकेची चौकशी झाली आहे का?, कर्तव्यात कसूर किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का?, अवैध जुगाराला कोणाचे संरक्षण होते, येथील कलेक्टर कोण होता, आदी प्रश्न केवळ संशयापुरता मर्यादित न राहता निष्पक्ष चौकशीतून निकाली निघाला पाहिजे. गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर स्थानिक पोलीस यंत्रणेची जबाबदारीही निश्चित केली जाणार का, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More