नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा; ‘साई कन्सल्टन्सी’च्या संचालकावर गुन्हा!

– लकडगंजमध्ये २५.२३ लाखांची फसवणूक; पैसे मागितल्यावर ‘जेलमध्ये पाठवतो’ची धमकी

The Exposer
नागपूर : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाकडून तब्बल ११ लाख रुपये उकळल्यानंतरही नोकरी न देता त्याला धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. याच पद्धतीने अन्य चार व्यक्तींकडूनही १४ लाख २३ हजार ८६५ रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात एकूण २५ लाख २३ हजार ८६५ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी निर्भय मोतीराम राऊत (२९) रा. प्लॉट क्र. डी/32, वृंदावन नगर, नंदनवन, यांना नोकरीची आवश्यकता होती. त्यांची ओळख लकडगंज हद्दीतील खांडवानी आर्केड, आंबेडकर चौक, सी.ए. रोड येथील ‘श्री साई कन्सल्टन्सी’चे संचालक आरोपी किरण महादेवराव हेडाऊ (५५) रा. अभिनव घरकुल योजना, फ्लॅट नंबर एम जी १२, चिखली कळमना यांच्याशी झाली. आरोपीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर १ जानेवारी २०२४ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी फोन-पे व आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल ११ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही नोकरी लावून दिली नाही. फिर्यादीने रक्कम परत मागितली असता आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

पैसे परत करण्याचा तगादा लावल्यानंतर आरोपीने, ‘मी हार्ट पेशंट आहे, मला काही कमी-जास्त झाल्यास तुला जेलमध्ये जावे लागेल,’ अशा शब्दांत धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे, तर आरोपीने याच पद्धतीने अन्य चार व्यक्तींनाही नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून त्यांच्याकडून १४ लाख २३ हजार ८६५ रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. या व्यक्तींनाही नोकरी न दिल्याने आरोपीने फिर्यादीसह अन्य चार जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू

फिर्यादीने दिलेली तक्रार आणि अर्जाची चौकशी केल्यानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक सोनल शिंदे यांनी या प्रकरणात फिर्यादीची नोंद केली असून, पुढील तपास सुरू असून आरोपीने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची, आणि मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More