– मनपाच्या कचरा गाडीवर काम करून चालवत होता कुटुंबाचा उदरनिर्वाह
– १० वर्षांच्या मुलाने चाकूने दोर कापून वडिलांना खाली उतरवले
– पत्नी व मुलावर दुःखाचा डोंगर; मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार
The Exposer
नागपूर : माजी आमदारांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच पत्नीने त्यांचे पाय उंचावून धरले, तर अवघ्या १० वर्षांच्या मुलाने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने दोर कापून वडिलांना खाली उतरवले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी नगर परिसरात बुधवारी सकाळी घडली.
मृताचे नाव पदम भुरे (४०) असून ते मूळचे कटणी, मध्य प्रदेश येथील रहिवासी होते. गेल्या सात वर्षांपासून ते पत्नी व १० वर्षांच्या मुलासह जानकी नगर परिसरात राहत होते. पदम हे नागपूर महापालिकेच्या कचरा गाडीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांची पत्नी परिसरात घरकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पदम हे पत्नी व मुलासह माजी आमदारांच्या मालकीच्या इमारतीत भाड्याने राहत होते. शेजारील भाडेकरूने नुकतीच आपली खोली रिकामी केली होती. बुधवारी सकाळी पत्नी काही वेळासाठी घराबाहेर गेल्यानंतर पदम यांनी शेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
काही वेळाने पत्नी घरी परतली असता तिला बाजूच्या खोलीत पदम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हे दृश्य पाहून तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून १० वर्षांचा मुलगाही धावत आला. वडिलांना वाचविण्यासाठी मुलाने स्वयंपाकघरातून भाजी कापण्याचा चाकू आणला. पत्नीने पदम यांचे पाय उंचावून धरले, तर मुलाने चाकूच्या साहाय्याने दोर कापून त्यांना खाली उतरवले.
दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारीही घटनास्थळी धावून आले. गंभीर अवस्थेतील पदम यांना पत्नी व नातेवाईकांनी ऑटोच्या माध्यमातून तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पदम यांच्या मृत्यूने पत्नी व १० वर्षांच्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार हरपल्याने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सायंकाळी मानेवाडा घाटावर पदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांसह स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक










