‘वेगाचा कहर’; आधी दुभाजकाला, नंतर उभ्या ट्रकवर आदळली कार

– दोन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर, १७ वर्षीय अल्पवयीनाच्या हातात कारची स्टेअरिंग

The Exposer
नागपूर : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांचा आनंदाचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत काळरात्र ठरला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम रस्ता दुभाजकाला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ही थरारक घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा बायपासवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर आनंद बेहार (वय १७, रा. प्लॉट नं. ३६८, सुभाननगर), भौमिक अमोल लारोकर (वय १६, रा. संचेती कॉलेज, वर्धा रोड) आणि सागर संजय मेलवाणी (वय १७, रा. पारडी) हे तिघे मित्र मिहीर बेहार याच्या वडिलांच्या मालकीची इलेक्ट्रिक टाटा कर्व्ह कार क्रमांक MH 49 CS 0427 घेऊन मित्र जयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते.
मित्र जय याला येण्यास काही वेळ असल्याने तिघेही कारमधून परिसरात चक्कर मारत होते. त्यावेळी मिहीर बेहार हा कार चालवत होता. कारमध्ये एक मित्र पुढील सीटवर तर दुसरा मागील सीटवर बसला होता.
दरम्यान, भरतवाडा वाय-पॉईंटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या CG 04 MC 2981 क्रमांकाच्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर आनंद बेहार जखमी झाला असून त्याच्यावर तारांगण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमना पोलिसांनी मर्ग खबरीवरून मर्ग (AD) दाखल केला असून, घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आधी दुभाजकाला धडक, नंतर ट्रकवर आदळली कार

भरतवाडा बायपासजवळ कार भरधाव वेगात असताना मिहिरचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नियंत्रण सुटलेल्या कारने सर्वप्रथम रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीजी ०४ एमसी २९८१ क्रमांकाच्या ट्रकवर मागून जाऊन आदळली. ट्रकला झालेल्या जोरदार धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी तातडीने बाहेर काढले

अपघाताची माहिती मिळताच कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर भौमिक आणि सागर यांना मृत घोषित केले. मिहीरवर उपचार सुरू आहेत.

स्टंटबाजीच्या दिशेनेही तपास?

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे. भरधाव कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला आणि त्यानंतर उभ्या ट्रकला धडकताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारचा वेग किती होता, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि अपघातापूर्वी कारमध्ये स्टंटबाजी किंवा अन्य प्रकार सुरू होता का, या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करीत आहेत.

अल्पवयीनाच्या हातात कारची स्टेअरिंग कशी?

या अपघातानंतर सर्वाधिक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे १७ वर्षीय अल्पवयीनाच्या हातात कारची स्टेअरिंग आलीच कशी? प्राथमिक माहितीनुसार मिहिरकडे कार चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तरीही तो कार चालवत होता.

अल्पवयीन मुलाला कार कोणी दिली, त्याला वाहन चालविण्याची परवानगी कोणी दिली आणि वाहनाच्या चाव्या त्याच्या हातात कशा गेल्या, याचा तपास कळमना पोलीस करीत आहेत.

कार देणाऱ्या वडिलांवरही कारवाईची तयारी

पोलिसांच्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी मिहिरने वडिलांकडून कार मागितली होती. कार उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणात मिहिरच्या वडिलांची भूमिका तपासली जात आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देण्याच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More