– दुसऱ्या पसंतीच्या मतांनी फिरवले निकालाचे गणित; वंजारींना ६७,२३१, तर कोहळेंना ६३,९६० मते
The Exposer
नागपूर : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पराभवाचा धक्का दिला. तब्बल ४५ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर या अटीतटीच्या लढतीचा निकाल स्पष्ट झाला. वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रमाची मिळून ६७ हजार २३१ मते मिळाली, तर कोहळे यांच्या पारड्यात ६३ हजार ९६० मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली. तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली.
द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले. कोहळे यांना ६३,९६० मते मिळाली.
१५ हजार ३२ मतपत्रिका अवैध; मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह
या निवडणुकीतील अवैध मतांची संख्याही लक्षवेधी ठरली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली, तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. मोठ्या संख्येने मतपत्रिका अवैध ठरल्याने पदवीधर मतदारांनी पसंतीक्रम नोंदविताना आवश्यक ती काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
८४ टेबलांवर मतमोजणी; ४५ तासांनंतर निकाल
नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ८४ टेबलांवर मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, आवश्यक कोट्याची पडताळणी आणि त्यानंतरच्या बाद फेऱ्यांमुळे मतमोजणीची प्रक्रिया दीर्घकाळ चालली. अखेर ४५ तासांहून अधिक काळानंतर निकाल जाहीर झाला.
या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विभागातील जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
२३ ऑक्टोबरला मतदान; २७ ऑक्टोबरपासून मतमोजणी
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली.
अखेरच्या टप्प्यापर्यंत उत्सुकता कायम राहिलेल्या या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयाचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरली आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय नोंदविला.
Author: संतोष तायडे
संपादक















