रवींद्र अपार्टमेंटमध्ये अचानक आवराआवर; कुकरेजा बिल्डरने का गुंडाळले बिऱ्हाड?

-:१०० फुटांपेक्षा अधिक खोल खड्डे खोदून बुजविले; अखेर अवजड मशीनरीसह बांधकाम साहित्यही हलविले

The Exposer
नागपूर : बजाजनगर परिसरातील सुरेंद्रनगर आरटीपीएस जवळील रवींद्र अपार्टमेंटमधील ४८ फ्लॅटधारकांच्या पुनर्विकासाच्या कथित नियमबाह्य करारनाम्याचा वाद ऐरणीवर असतानाच कुकरेजा बिल्डरने अचानक बांधकाम साहित्य आणि अवजड मशीनरी परिसरातून हलविल्याची घटना समोर आली आहे. सॉईल टेस्टिंगच्या नावाखाली १०० फुटांपेक्षा अधिक खोल खड्डे खोदणे, आणि नंतर ते बुजविणे आणि अवघ्या काही तासांत संपूर्ण साहित्याची आवराआवर करून मशीनरीसह ट्रक रवाना करणे, या घडामोडींमुळे परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांच्या शनिवारी नियोजित पत्रकार परिषदेपूर्वीच हा घटनाक्रम घडल्याने कुकरेजा बिल्डरने रवींद्र अपार्टमेंटमधून बिऱ्हाड गुंडाळले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी खड्डे खोदणारे अवजड वाहन आणि मशीन रवींद्र अपार्टमेंटच्या ‘बी’ विंगमध्ये दाखल झाले. १९ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात करण्यात आली. याचदरम्यान ‘बी’ विंगमधील तळमजल्यावरील एका फ्लॅटचा वापर मजुरांच्या निवासासाठी तसेच बांधकामाशी संबंधित साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता.

दरम्यान या ठिकाणी दोन खड्डे १०० फुटांपेक्षा अधिक खोल खोदण्यात आल्याची माहिती आहे. नंतर हे दोन्ही खड्डे अचानक बुजविण्यात आले. त्यानंतर खोदकाम करणारे अवजड वाहन ‘अ’ विंगजवळील प्रकाश बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांलगत, ये-जा करण्याच्या मार्गाजवळ उभे करण्यात आले.

पुढे ‘अ’ विंगच्या तळमजल्यावरील फ्लॅटला अगदी लागून खोदकाम करणारे वाहन उभे करून पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे १५ फुटांचे खोदकाम झाल्यानंतर कोणाच्या तरी निर्देशावरून काम थांबविण्यात आले. खड्डा बुजविल्यानंतर मशीन बंगल्याजवळ आणून उभी करण्यात आली.

३१ ऑक्टोबरला काही तासांत साहित्य आणि मशीनरी रवाना!

३१ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास एक मोठा लोडिंग ट्रक आणि जीप रवींद्र अपार्टमेंटच्या परिसरात दाखल झाली. त्यानंतर ‘बी’ विंगमधील तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये ठेवलेले बांधकाम साहित्य जीपच्या साहाय्याने आणून तीन ते चार व्यक्तींनी ट्रकमध्ये भरण्यास सुरुवात केली.

प्रकाश बंगल्याच्या गॅरेजमध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणातील साहित्यही बाहेर काढून ट्रकमध्ये भरण्यात आले. काही साहित्य गॅरेजमध्येच ठेवण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास मोठी क्रेन परिसराच्या प्रवेशद्वाराबाहेर दाखल झाली. काही वेळातच साहित्याने भरलेला ट्रक अपार्टमेंटच्या परिसरातून बाहेर पडला.

त्यानंतर खोदकाम करणारे अवजड वाहनही परिसरातून बाहेर काढण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने ते ट्रकवर चढविण्यात आले. अशा प्रकारे दुपारी अडीचच्या सुमारास खोदकामाची मशीन घेऊन ट्रक रवींद्र अपार्टमेंटच्या परिसरातून रवाना झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खोदकामाच्या कामाला अचानक पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसून आले.

खोदकामापासून अचानक आवराआवरीपर्यंत अनेक प्रश्न!

सॉईल टेस्टिंगच्या नावाखाली नेमकी कोणती तपासणी करण्यात आली? दोन ठिकाणी १०० फुटांपेक्षा अधिक खोल खड्डे खोदण्याची आवश्यकता काय होती? खोदलेले खड्डे पुन्हा बुजविण्यामागचे कारण काय? विंगमधील फ्लॅटला लागून खोदकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? ३० ऑक्टोबर रोजी काम अचानक थांबविण्याचे निर्देश कोणी दिले? आणि दुसऱ्याच दिवशी ट्रक व क्रेनच्या मदतीने साहित्य आणि मशीनरी हलविण्याची घाई का करण्यात आली? संबंधित विभागाकडून खड्डे खोडण्याची परवानगी होती का?, अशी चर्चा फ्लॅटधारकात रंगली आहे.

जनार्दन मून यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत रवींद्र अपार्टमेंटमधील ४८ फ्लॅटधारकांच्या कथित नियमबाह्य पुनर्विकास करारनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केल्याची माहिती देत कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये खोदकामासाठी घेतलेल्या परवानग्या, सॉईल टेस्टिंगचा अहवाल आणि पुनर्विकास करारनाम्याची वैधता यांची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, आदी मागण्याचा समावेश होता.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More