– अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढला; २९ तोळे सोने आणि ६२५ ग्रॅम चांदी हस्तगत
The Exposer
नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत तब्बल ४२ लाख ७९ हजार ९९० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणात करण खेमचंद मेश्राम (वय १९, रा. लष्करीबाग, तक्षशिला बौद्धविहारजवळ, गल्ली क्रमांक ८, पाचपावली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत एका विधी संघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
बजाजनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ५०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना घरफोडी विरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासासोबतच परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. अखेर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

२९ तोळे सोने, ६२५ ग्रॅम चांदी जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २९६.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असून त्यांची अंदाजे किंमत ४१ लाख ४४ हजार ९८० रुपये आहे. तसेच ६२४.९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ज्यांची किंमत १ लाख २४ हजार ९८६ रुपये आहे, तेही हस्तगत करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ४२ लाख ७९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.
या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार प्रशांत गभने, गणेश बरडे, सहायक फौजदार नितीन तिवारी, पोलीस शिपाई पंकज निकम, अमन राऊत आणि सुधीर पवार यांनी पार पाडली. तसेच सायबर विभाग, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे व त्यांच्या पथकाने विशेष प्रयत्न केले.
Author: संतोष तायडे
संपादक















