– झोन चौकात भीषण अपघात; सहकारी प्राध्यापकही जखमी, अपघातानंतर ट्रकचालक फरार
The Exposer
नागपूर : हिंगणा मार्गावरील झोन चौकात भरधाव ट्रकने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने महिला प्राध्यापिकेचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले आणखी एक प्राध्यापक जखमी झाले. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्राध्यापिकेचे नाव प्रियंका प्रवीण मोरे (३५) असून त्या प्रियंका साहेबराव खांडेकर या नावानेही परिचित होत्या. त्या वानाडोंगरी येथील वायसीसी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्याच महाविद्यालयातील प्राध्यापक जीवन नामदेवराव डेहनकर (४०) हे त्यांच्यासोबत स्कूटीवर प्रवास करीत होते.
३ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रियंका मोरे या सुजुकी एक्सेस (एमएच-४९-सीएन-६८९३) या स्कूटीने हिंगणा मार्गावरील झोन चौकातून महाविद्यालयाकडे जात असताना मागून आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रियंका गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. त्यांना तातडीने वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात प्राध्यापक जीवन डेहनकर हेही जखमी झाले.
दरम्यान, अपघात घडवून ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. प्राध्यापक जीवन डेहनकर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ व १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक















