– कैद्यांच्या श्रमातून तयार होणार दिवाळीचा फराळ; कारागृहातील कँटीनमधून लाडूंसह चिवडा, करंजी आणि अनारशांचाही आस्वाद घेता येणार
The Exposer
नागपूर : गुन्हेगारीच्या अंधारातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची संधी मिळावी, यासाठी कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याच उपक्रमाला दिवाळीच्या निमित्ताने गोडव्याची जोड मिळाली आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६० कारागृहांमध्ये कैद्यांच्या हातून दिवाळीचा फराळ तयार केला जात असून, नागपूर मध्यवर्ती कारागृहात तब्बल ४५० किलो बुंदीचे लाडू तयार करण्यात येणार आहेत.
कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यातील कौशल्यविकासासाठी कारागृहांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कैद्यांना लाडू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून तयार होणारा फराळ केवळ सणाचा आनंद वाढवत नाही, तर कैद्यांना श्रमाचे महत्त्व, स्वावलंबन आणि कामातून मिळणाऱ्या समाधानाची जाणीवही करून देतो.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात यंदा दिवाळीनिमित्त ४५० किलो बुंदीचे लाडू बनविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारागृहातील कँटीनमधून कैद्यांना हे लाडू खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे, कैद्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सुमारे २५० ग्रॅमपासून पुढे लाडू खरेदी करता येतील. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे काही कैद्यांना स्वतःच्या पैशातून फराळ खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे कारागृहातील इतर सहकारी आणि नातेवाईकांकडून मिळणारी मदतही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते.
लाडूंसोबत चिवडा, करंजी आणि अनारशांचाही बेत!
नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कँटीनमध्ये बुंदीच्या लाडूंसह चकली, अनारसे, शेव, चिवडा, करंजी आणि शंकरपाळे यांसारखे पारंपरिक दिवाळीचे पदार्थही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे कारागृहाच्या भिंतीआड असलेल्या कैद्यांनाही दिवाळीचा आनंद घेता येणार आहे.
बॅरेक परिसरात आकाशकंदिलांची रोषणाई
दिवाळीचा आनंद केवळ फराळापुरता मर्यादित न ठेवता कारागृह प्रशासनाने बॅरेक परिसरात आकाशकंदीलही लावले आहेत. कैद्यांना सणासुदीच्या काळात सकारात्मक वातावरण मिळावे, त्यांच्या मानसिक आरोग्याला चालना मिळावी आणि त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कारागृह अधीक्षक वैभव आगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, कैद्यांना सणाचा आनंद देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनालाही प्राधान्य दिले जात आहे.
कारागृहाच्या चार भिंतींआड शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तींनाही सणासुदीच्या आनंदापासून वंचित ठेवू नये, तर त्यांच्यातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन द्यावे, हा या उपक्रमामागील मानवी दृष्टिकोन विशेष उल्लेखनीय आहे. दिवाळीचा गोडवा केवळ घराघरांतच नव्हे, तर कारागृहाच्या भिंतीआडही पोहोचविण्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















