– लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांत आगीच्या ४२ हून अधिक घटना; जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचा प्रतिबंधात्मक निर्णय
The Exposer
नागपूर : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करताना होणाऱ्या संभाव्य दुर्घटना आणि आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. शहरात आकाशात उडणारे रॉकेट, स्काय रॉकेट, स्काय शॉट, एरियल शेल्स तसेच तत्सम प्रकारचे हवेत उडणारे फटाके यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ३० नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी ९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४२ हून अधिक आगीच्या घटना
महापालिकेच्या आदेशानुसार, ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूर शहरात अवघ्या २४ तासांत आग लागण्याच्या ४२ हून अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आकाशात उडणारे रॉकेट, स्काय शॉट आणि तत्सम फटाक्यांमुळे तसेच त्यांच्या ठिणग्या ज्वलनशील वस्तूंवर पडल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले.
इमारतींची छते, गच्ची, झोपडपट्टी परिसर, भंगार गोदामे, कचरा साठवणूक केंद्रे, वाहनतळ, खिडक्या, पेट्रोल पंप आणि पार्किंगमधील वाहनांवर फटाक्यांच्या ठिणग्या पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या परिसरांमध्ये फटाके उडविण्यास मनाई
महानगरपालिका हद्दीतील इमारतींच्या गच्ची, टेरेस, बाल्कनी, रिफ्युज एरिया, अरुंद रस्ते, झोपडपट्टी क्षेत्र, दाट लोकवस्तीचे निवासी परिसर, बाजारपेठा आणि वाहनतळ अशा ठिकाणी आकाशात उडणारे रॉकेट, स्काय रॉकेट, स्काय शॉट, एरियल शेल्स व तत्सम फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोलीस आणि अग्निशमन विभागाला अंमलबजावणीचे आदेश
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय, महापालिकेचा अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, झोनचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. आदेशाची माहिती वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि सार्वजनिक सूचना फलकांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आदेश मोडल्यास दंडात्मक कारवाई
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधित विक्रेत्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार सक्षम प्राधिकरणामार्फत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनी उत्सव साजरा करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, फटाक्यांच्या वापराबाबत प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि संभाव्य आग दुर्घटना टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















