– राज्यात जलसंकटाचे सावट, शेतकऱ्यांना तातडीच्या शासकीय मदतीची गरज; मात्र महिला तलाठ्याच्या दहा दिवसांच्या रजेने नागरिकांची कामे खोळंबली!
The Exposer
नागपूर : राज्यात वाढत्या जलसंकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असताना त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, दुसरीकडे वेळा येथील महसूल कार्यालयाला चक्क १८ नोव्हेंबरपर्यंत कुलूप लागणार असल्याची बाब समोर आली आहे. येथील तलाठी प्रिया राऊत यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत रजेचा अर्ज दिला असून, तहसीलदारांनी ही रजा मंजूर केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गावातील शेतकरी आणि नागरिकांची महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवाळीनंतर सोमवारपासून शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू झाले. मात्र, वेळा येथील तलाठी कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिकांना कार्यालय बंद असल्याचे दिसले. यासंदर्भात वेळा ग्रामपंचायतीचे सदस्य आशीष भोयर यांनी तलाठी प्रिया राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी मंगळवारपर्यंत रजेवर असल्याचे सांगितले. तसेच १८ नोव्हेंबरपर्यंत कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, तलाठी कार्यालय हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. पीक नुकसानीचे अहवाल तयार करणे, सातबारा व आठ-अ उतारे, फेरफार नोंदी, जमीन व प्लॉटसंबंधी कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात वारंवार जावे लागते. अशा परिस्थितीत कार्यालयच बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
वेळा परिसरासह हुडकेश्वर खुर्द, सालई, बेसा, चिकणा, धामना आणि डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनीही महसूल विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जलसंकटामुळे शेतीचे नुकसान होत असताना पीक नुकसानीचे अहवाल, जमिनीचे सातबारा, आठ-अ आणि फेरफार यांसारख्या कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
विशेष म्हणजे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना अर्जंट मदत मिळावी, यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे निर्देश दिल्याची चर्चा असताना, वेळा येथे दहा दिवसांची रजा मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात महसूल कार्यालयच बंद असेल, तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. तहसील प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वेळा महसूल कार्यालयात पर्यायी कर्मचाऱ्याची व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















