डॉ. आंबेडकर कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. दीपा पानेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा! प्राचार्यांच्या केबिनचे कुलूप तोडून कागदपत्रे, सीसीटीव्ही हार्डडिस्क पळविल्याचा आरोप

The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्यपदावरून सुरू असलेला वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांच्या केबिनचे कुलूप तोडून अनधिकृतपणे प्रवेश करणे, महत्त्वाची शासकीय व प्रशासकीय कागदपत्रे, कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका, वैयक्तिक फाइल्स, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्क काढून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आरोपी प्राध्यापक डॉ. दीपा पानेकरसह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी डॉ. भुवनेश्वरी अशोक मेहरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 329(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर क्रमांक 0530/2026 असा असून, 14 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 10.16 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

नेमका काय आहे प्राचार्यपदाचा वाद?

एफआयआरमधील तक्रारीनुसार, डॉ. भुवनेश्वरी मेहरे या 13 एप्रिल 2022 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नियमित प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याचे नमूद आहे. 27 जानेवारी 2025 रोजी त्यांना दीक्षाभूमी स्मारक समितीच्या तत्कालीन अध्यक्षांकडून पूर्व पदावरून हटविण्यात आल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.

या निर्णयाला त्यांनी विद्यापीठ न्यायाधिकरणात आव्हान दिले. 20 ऑगस्ट 2026 रोजी अपील दाखल केल्यानंतर 1 ऑक्टोबर 2026 रोजी न्यायाधिकरणाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. दीपा पानकर यांना तात्पुरत्या स्वरूपात कार्यकारी प्राचार्य म्हणून दिलेली मान्यता रद्द केल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. तसेच, 30 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित पदावनतीचे आदेश रद्द करून बाजू कायम ठेवल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

१४ नोव्हेंबरला सकाळी नेमके काय घडले?

तक्रारीनुसार, 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आरोपी डॉ. दीपा पानकर, सिद्धार्थ म्हैसकर, अविनाश घोडपे, राम घोडे व इतर संबंधित व्यक्तींनी महाविद्यालयातील महिला प्राचार्यांच्या दालनाचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे. यावेळी प्राचार्यांच्या दालनातील कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका, वैयक्तिक फाइल्स, विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षेचे अर्ज आणि सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्क काढून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बीसीयूडी पासवर्ड बदलण्याचे दहापेक्षा अधिक प्रयत्न?

या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे महाविद्यालयाच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विकास विभागाच्या (BCUD) संगणकीय प्रणालीचा पासवर्ड बदलण्यासाठी दहापेक्षा अधिक वेळा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रणालीचा पासवर्ड बदलण्याचा अधिकार केवळ प्राचार्यांकडे असल्याचा दावाही तक्रारदाराने केला आहे.

चार जणांविरुद्ध गुन्हा; तपास उपनिरीक्षकांकडे

या प्रकरणात एफआयआरमध्ये डॉ. दीपा यश पानकर, सिद्धार्थ म्हैसकर, अविनाश घोडपे आणि राम घोडे यांची नावे आरोपी म्हणून नमूद आहेत. बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक पंकज बावणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, प्राचार्यपदाच्या न्यायालयीन वादातून महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज, महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविद्यालयात नेमके काय घडले, कागदपत्रे व हार्डडिस्क प्रत्यक्षात काढून नेण्यात आली का, उपस्थिती रजिस्टरमध्ये फेरफार झाला का आणि बीसीयूडी प्रणालीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा तपासातून उलगडा होणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More