– तक्रारीत सुधीर फुलझेले, रवी मेंढे व सिद्धार्थ म्हैसकरच्या नावाचाही समावेश
– महिला असल्यामुळे मानसिक व प्रशासकीय छळ- प्राचार्यपदाच्या संघर्षाला नवे वळण
The Exposer
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी अशोक मेहरे यांनी आता आपल्या न्यायासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. भंते सुरई ससाई, सुधीर फुलझेले, रवी मेंढे आणि सिद्धार्थ म्हैसकर यांच्याविरोधात त्यांनी महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. या तक्रारीमुळे दीक्षाभूमीशी संबंधित महाविद्यालयातील प्रशासकीय वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात वारंवार हस्तक्षेप करून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. मेहरे यांनी तक्रारीत केला आहे. आपण महिला असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात असून, जाणीवपूर्वक मानसिक आणि प्रशासकीय छळ केला जात असल्याची त्यांची भूमिका आहे.

प्राचार्यपदाचा वाद आता महिला सन्मानाच्या मुद्द्यावर!
महाविद्यालयातील प्रशासकीय निर्णय आणि कामकाजात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे आपल्याला काम करणे कठीण होत असल्याचे डॉ. मेहरे यांनी तक्रारीत नमूद केल्याचे समजते. या घटनांमुळे आपल्या सुरक्षिततेबाबतही चिंता निर्माण झाली असून, महिला प्राचार्य म्हणून सन्मानाने आणि निर्भयपणे काम करता यावे, यासाठी संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तक्रारीतील आरोपांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषी आढळणाऱ्यांविरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी महिला आयोगाकडे केली आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीने बेठकीत कुठलाही ठराव घेतला नसतांना गैरकायदेशीररित्या वारंवार निलंबणाचे पत्र काढून भंते ससाई छळ करीत असल्याचा प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांच्या आरोपाने प्रचंड खळबळ उडाली आहे.
महिला आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यपद आणि प्रशासकीय अधिकारांवरून सुरू असलेला वाद यापूर्वीही चर्चेत आला आहे. आता या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाल्याने वादाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. एका महिला प्राचार्याने आपल्या मानसिक छळाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न थेट महिला आयोगासमोर उपस्थित केल्याने या प्रकरणाची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू झाली आहे. महिला आयोग या तक्रारीची दखल घेऊन कोणती पावले उचलतो, संबंधितांना काय भूमिका मांडण्याची संधी दिली जाते आणि चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















