– GST चोरीच्या प्रकरणात मोक्काची भीती दाखवून कुटुंबाकडून पैसे घेतल्याचा संतोष ऊर्फ बंटी शाहू यांचा आरोप
– २५ लाख रुपये अद्याप परत मिळाले नसल्याचा दावा, वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशीची मागणी
The Exposer
नागपूर : GST चोरीच्या कथित ८०० कोटी रुपयांच्या प्रकरणात अटकेनंतर मोक्कासह गंभीर कारवाईची भीती दाखवून आपल्या कुटुंबीयांकडून दीड कोटी रुपयांचे पैसे घेतल्याचा गंभीर आरोप संतोष ऊर्फ बंटी शाहू यांनी केला आहे. या कथित आर्थिक व्यवहारांमध्ये तत्कालीन DCP राहुल माकनिकर, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, क्राइम PI कमलाकर गड्डीममे, PI संदीप बुआ यांच्यासह भावेश खांडवानी, राहुल ऊर्फ मार्टिन कुहिकर आणि नीलेश नाईक यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणातील आरोपांची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी त्यांची मागणी आहे.
८०० कोटींच्या GST प्रकरणातून सुरू झाला घटनाक्रम
संतोष शाहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे २०२५ रोजी विश्वजीत रॉय यांच्या तक्रारीवरून नागपूर क्राइम ब्रँचने त्यांना आणि त्यांचे भाऊ जयेश शाहू यांना अटक केली होती. क्षितिज इंटरप्रायजेस या कंपनीच्या नावाचा वापर करून GST चोरी केल्याचा आरोप त्यांच्यासह अन्य पाच जणांवरही ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील कथित करचोरीची रक्कम सुमारे ८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.
१८ मे रोजी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात तत्कालीन DCP राहुल माकनिकर यांच्यासमोर हजर केले असता, संपूर्ण कुटुंबाला मोक्का लावण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप शाहू यांनी केला आहे. GST चोरीबाबत संबंधित विभागाची भूमिका तपासण्याची विनंती केल्यानंतर आपल्याशी अपमानास्पद भाषेत बोलण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पत्नीला कारवाईची भीती दाखवून दीड कोटींची मागणी?
शाहू यांच्या दाव्यानुसार, ते पोलीस कोठडीत असताना २१ मे २०२५ रोजी त्यांच्या पत्नी अंजना शाहू यांची वर्धमाननगर येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये भावेश खांडवानी, राहुल ऊर्फ मार्टिन कुहिकर आणि नीलेश नाईक यांच्याशी भेट झाली. या भेटीदरम्यान पती आणि दीर यांच्यावर मोक्का लावला जाऊ शकतो, तसेच कुटुंबातील महिलांनाही अटक होण्याची शक्यता असल्याचे सांगून भीती दाखविण्यात आल्याचा आरोप आहे.
कथित कारवाई टाळण्यासाठी दीड कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. या रकमेतील २५ लाख रुपये पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख आणि कमलाकर गड्डीममे यांच्यासाठी असल्याचे सांगण्यात आल्याचा दावाही शाहू यांनी केला आहे.
दोन दिवसांत दीड कोटी रुपये दिल्याचा दावा
शाहू यांच्या माहितीनुसार, २१ मे रोजी रात्री महाल परिसरातील एका दुकानाजवळ ७० लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर २२ मे रोजी मेयो हॉस्पिटल परिसरात त्यांचा मुलगा आदित्य आणि सून सुरभी यांनी आणखी ८० लाख रुपये दिले. ही रक्कम उभी करण्यासाठी पत्नीने उसनवारी केली तसेच दागिने विकल्याचेही त्यांनी सांगितले.
या कथित व्यवहारांनंतर संबंधित व्यक्तींनी पोलीस अधिकाऱ्यांशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संवाद साधल्याचा आरोप शाहू यांनी केला आहे. या संभाषणांची आणि आर्थिक व्यवहारांची सत्यता इलेक्ट्रॉनिक व आर्थिक पुराव्यांच्या तपासातून स्पष्ट होऊ शकते.
एक कोटी दहा लाख परत; उर्वरित २५ लाखांचा तिढा
२२ मे रोजी न्यायालयात पत्नीने पैसे दिल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित रक्कम परत मागण्यास सांगितले. त्यावेळी PI कमलाकर गड्डीमे यांनी पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने आपण तातडीने न्यायालयात तक्रार केली नाही, असे शाहू यांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, २३ मे रोजी वर्धमाननगर येथील रेडियन्स हॉस्पिटल परिसरात त्यांच्या मुलाकडे एक कोटी दहा लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित ४० लाख रुपये परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यानंतर ३० जुलै २०२५ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी १० लाख रुपये रोख आणि पाच लाख रुपये RTGS द्वारे परत मिळाल्याचा दावा शाहू यांनी केला. त्यामुळे कथित व्यवहारातील उर्वरित २५ लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
GST तपासाच्या आधारावरही प्रश्नचिन्ह
या प्रकरणात संबंधित GST विभागाची अधिकृत भूमिका काय होती, कथित करचोरीची रक्कम निश्चित करण्याचा आधार काय होता आणि तपासादरम्यान आरोपींच्या कुटुंबीयांशी झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली आहे का, असे प्रश्न शाहू यांनी उपस्थित केले आहेत. याच प्रकरणातील अन्य आरोपींच्या कुटुंबीयांकडूनही अशा प्रकारे पैसे घेतले गेले होते का, याची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
तत्कालीन DCP राहुल माकनिकर, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, क्राइम PI कमलाकर गड्डीमे, PI संदीप बुआ, भावेश खांडवानी, राहुल ऊर्फ मार्टिन कुहिकर आणि नीलेश नाईक यांच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संतोष ऊर्फ बंटी शाहू यांनी केली आहे.
कथित आर्थिक व्यवहारांच्या बँक नोंदी, RTGS व्यवहार, उपलब्ध CCTV फुटेज, व्हॉट्सॲप संभाषण आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची कायदेशीर पद्धतीने तपासणी करावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात शाहू यांनी मुख्यमंत्र्यांकडे 17 ऑक्टॉबर 2025 रोजी तक्रार निवेदन मेल द्वारे पाठवून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते यश गौरखेडे उपस्थित होते.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित पोलीस अधिकारी व अन्य व्यक्तींची बाजू तसेच तपास यंत्रणेची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल. दीड कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांचा तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















