– बुद्ध विहारांच्या नोंदीसाठी दलित पँथर आक्रमक

The Exposer
नागपूर – भारत जनगणना-2027 अंतर्गत घरयादी गट मांडणीदर्शक नकाशा तयार करताना वापरण्यात येणाऱ्या जलस्त्रोत व भूचिन्हे (लँडमार्क) यादीत मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा यांचा समावेश करण्यात आला असला, तरी बौद्ध समाजाच्या उपासना स्थळ असलेल्या बुद्ध विहारांचा समावेश करण्यात आलेला नाही, असा आरोप करीत भारतीय दलित पँथरने नागपूर जिल्हाधिकारी तसेच मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र यांच्याकडे निवेदन सादर करून बुद्ध विहारांची अधिकृत नोंद करण्याची मागणी केली आहे.
भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बौद्ध विहारांना जनगणनेतील धार्मिक स्थळांच्या यादीत स्थान न दिल्यास राज्यभरातील हजारो बुद्ध विहार शासनाच्या अभिलेखांपासून वंचित राहतील. त्यामुळे बौद्ध समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून हा प्रकार बौद्ध उपासना स्थळांच्या अस्तित्वालाच नाकारण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम-1992 अंतर्गत बौद्ध समुदायाला राष्ट्रीय व राज्य स्तरावर अल्पसंख्यांक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. असे असताना चर्च, मशीद आणि गुरुद्वारांची नोंद घेऊन बुद्ध विहारांना वगळणे हे संविधानाच्या समानतेच्या तत्त्वाशी विसंगत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पँथरच्या मते, महाराष्ट्रात सुमारे 66 लाखांहून अधिक बौद्ध नागरिक असून ते राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 5.81 टक्के आहेत. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी 72.36 टक्के बौद्ध महाराष्ट्रात राहतात. नागपूर शहरात बौद्धांची संख्या सुमारे 86 हजार 850 असून शहरात जवळपास 450 बुद्ध विहारे अस्तित्वात आहेत. त्यामुळे आगामी जनगणनेत बुद्ध विहारांची नोंद न झाल्यास हजारो उपासना स्थळांचे अधिकृत अस्तित्व दुर्लक्षित होईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे हे निवेदन उपजिल्हाधिकारी (महसूल) सचिन गोसावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच दुसरे निवेदन पोस्टाद्वारे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
यावेळी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड, डॉ. प्रबोधन मेश्राम, गुलाब डोंगरे, सागर गजभिये, मधुकर गवळी, दिनेश बनसोड आणि अरुण चुनारकर आदी उपस्थित होते.
बुद्ध विहारांची जनगणनेत अधिकृत नोंद करण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल तसेच न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असा इशारा भारतीय दलित पँथरने दिला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











