महाज्योतीतील कारभार संशयाच्या भोवऱ्यात; आरोपांच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती

– निविदा प्रक्रिया, निधी वापर आणि प्रशिक्षणातील विलंबाची चौकशी, शासनाला लवकरच सादर होणार अहवाल

– आ. डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश, विधानपरिषदेत उपस्थित केला होता प्रश्न

The Exposer
नागपूर : महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनांमध्ये झालेल्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजल्यानंतर राज्य शासनाने संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विधान परिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.
महाज्योतीमार्फत आयबीपीएस, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग (SSC), पोलीस व लष्करी भरती, एमबीए-सीईटी, नेट-सेट आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. मात्र मागील सहा महिन्यांपासून प्रशिक्षण प्रक्रिया रखडल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असल्याचे आ. डॉ. फुके यांनी विधान परिषदेत नमूद केले.
त्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सुमारे 49 हजार 358 विद्यार्थ्यांनी अर्ज केले, मात्र अद्याप निवड यादी व निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. ऑगस्ट 2025 मध्ये महा-ई-टेंडर प्रणालीद्वारे प्रशिक्षण संस्थांच्या निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ उलटूनही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचू शकली नाही.
आ. डॉ. फुके यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले की, महाज्योतीसाठी जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही त्याचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालंय, पुणे च्या संचालक श्रीमती सोनाली मूळे यांच्या नेतृत्वातील एक सदस्ययी समिती गठीत करण्यात आली आहॆ. समितीला महाज्योतीच्या मागील वर्षभरातील कामकाजाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे समितीच्या चौकशी सह अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहॆ.

समितीच्या चौकशीतील प्रमुख मुद्दे

ऑनलाइन प्रशिक्षणासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची तपासणी. मेंटर स्कूल योजनेअंतर्गत संस्थांची निवड व कार्यपद्धतीची पडताळणी. प्रशिक्षण संस्थांच्या निवडीसाठी ठरविण्यात आलेल्या निकषांची तपासणी.
विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची समीक्षा. आवश्यकतेनुसार इतर बाबींचीही चौकशी.

विद्यार्थ्यांमध्ये आशेचे निर्माण झाले आहॆ वातावरण

शासनाने समितीला दोन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाज्योतीच्या प्रशिक्षण योजनांमधील विलंब, निधीचा अपुरा वापर आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबतचा मुद्दा आ. डॉ. फुके यांनी विधान परिषदेत प्रभावीपणे मांडल्यानंतर शासनाने चौकशीचे पाऊल उचलल्याने विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More