– नागपूरात अनधिकृत मटण विक्रेत्यांना अभय?; नागरिकांचा अन्न व औषध प्रशासनावर सवाल
The Exposer
नागपूर : उपराजधानीतील अनेक भागांत रस्त्याच्या कडेला विनापरवाना बकरे, कोंबड्यांची कत्तल करून मटण विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरच रक्ताचा सडा, मांसाचे तुकडे, दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही विक्रेते अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून उघड्यावर मटण विक्री करीत आहेत. विशेषतः शिळे मटण विक्री, उघड्यावर मांस लटकविणे, स्वच्छतेचे निकष न पाळणे आणि कत्तलीसाठी आवश्यक परवान्यांचा अभाव अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नाल्याच्या काठावर अतिक्रमण करून अनेकांनी मटणाचे दुकान थाटले आहेत. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या पावसाळी नालीत मटण विक्रेते हे घात टाकत असल्याचा आरोप आहॆ.
याशिवाय रस्त्याच्या कडेला उघडपणे मांस लटकवून ठेवण्यात येत असल्याने लहान मुलांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच शाकाहारी नागरिकांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जात असल्याचाही काही नागरिकांचा दावा आहे. त्यात मटण खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, नागपूर महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील सर्व मटण विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नागपूर शहरात किती अधिकृत (परवानाधारक) आणि किती अनधिकृत मटण विक्रेते कार्यरत आहेत, याची संपूर्ण माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी व वृत्तपत्रांद्वारे जाहीर करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर विषयावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या तुकाराम मुंडे यांच्याकडून वाढल्या अपेक्षा
या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख अधिकारी श्री. तुकाराम मुंडे यांच्याकडे प्रश्न उपस्थित करत, शहरातील नियमभंग करणाऱ्या मटण विक्रेत्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल केला आहे. तसेच अशा विक्रेत्यांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचा आरोपही नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे तुकाराम मुंडे यांच्याकडुन नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











