– गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रेरणादायी आवाहन
The Exposer
नागपूर : “यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. शिक्षण, शिस्त, कठोर परिश्रम आणि योग्य ध्येय यांची सांगड घातल्यास प्रत्येक विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतो,” असे प्रतिपादन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले.

ग्लोबल युनायटेड एज्युकेशनल अँड सोशल सोसायटी, नागपूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथील नागार्जुन सभागृहात आयोजित “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्या” प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आपल्या प्रेरणादायी भाषणात संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व पटवून देत मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले. “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती विकसित केली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता आहे. मात्र योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार यांची जोड मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निशांतजी मेश्राम होते. त्यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे तसेच ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनीही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय संस्थेचे सचिव क्षितीज गायकवाड यांच्यासह ज्ञानदीप गायकवाड, प्रकाश कुंभे, रजत महेशगवळी, निखिल मेश्राम, अश्वजीत गायकवाड, विनोदकुमार धाबर्डे, मनोज वासनिक, सुरेश खोब्रागडे, अमन खरे व सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर, उपस्थित नागरिक आणि सहकार्य करणाऱ्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
Author: संतोष तायडे
संपादक











