– क्वेटा कॉलनीतील थरारक घटना; दुकानातील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचाही पोलिसांकडून तपास
The Exposer
नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका किराणा व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, दुकानातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही कसून चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धमान नगर येथील रहिवासी आणि किराणा व्यापारी आसाराम तलरेजा (वय 51) हे क्वेटा कॉलनीतील नरेश डेअरीसमोर आपली मारुती स्विफ्ट कार उभी करून किराणा माल खरेदीसाठी गेले होते. कारच्या पुढील सीटवर त्यांनी रोकड भरलेली बॅग ठेवली होती.
व्यापारी कारपासून दूर जाताच अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. अवघ्या पाच मिनिटांच्या आत चालकाच्या बाजूची काच फोडून समोरील सीटवरील रोकड भरलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेत सुमारे 4.50 लाख रुपये रोख रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. ही रक्कम व्यापारी व्यवहारातून जमा झालेली असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील तसेच व्यापाऱ्याच्या दुकानापासून घटनास्थळापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या फुटेजमध्ये तीन संशयितांची हालचाल आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आरोपींना कारमध्ये रोकड असल्याची माहिती कशी मिळाली, याचा शोध घेताना काही कर्मचाऱ्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. ‘टीप’ मिळाल्यानंतरच आरोपींनी कारचा पाठलाग करून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्या ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी सुरू असून, या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











