– शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी युवक-युवतींचा निर्धार
– नागपुरात वाढतोय जनसहभाग; पालकांचाही आंदोलनाला पाठिंबा
The Exposer
नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपर लीक प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधातील आंदोलनाची ठिणगी आता देशभर पोहोचली असून नागपूरच्या संविधान चौकातही युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, समान संधी आणि गुणवत्तापूर्ण सुधारणा व्हाव्यात, या अपेक्षेने अनेक तरुण स्वतःहून आंदोलनात सहभागी होत आहेत.

संविधान चौकात दररोज विविध क्षेत्रातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, तसेच तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. आंदोलनस्थळी येणाऱ्या युवक-युवतींच्या चेहऱ्यावर भीती किंवा संकोच नसून आपल्या भविष्यासाठी आवाज उठविण्याचा ठाम निर्धार दिसून येत आहे.
शुक्रवारी आंदोलनादरम्यान घडलेल्या दोन घटनांनी अनेकांचे लक्ष वेधले. एका पालकांनी सांगितले की, त्यांची मुलगी नुकतीच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली आहे. तिने वडिलांना स्पष्ट शब्दांत सांगितले, “पप्पा, मला या आंदोलनाचा भाग व्हायचे आहे. तुम्ही मला संविधान चौकात सोडता का? नाहीतर मी स्वतः टॅक्सी करून जाईन.” मुलीचा ठाम निर्धार पाहून वडिलांनी तिला स्वतः आंदोलनस्थळी आणून सोडले.

दुसरी घटना एका ज्येष्ठ महिलेची होती. पावसाचे वातावरण असूनही त्यांनी आपल्या मुलाला, “तू मला संविधान चौकात सोड, नाहीतर मी टॅक्सी करून जाईन,” असे सांगितले. आईची भावना ओळखून मुलाने त्यांना आंदोलनस्थळी आणले. त्या महिलांनी सरकारविरोधी मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलन संपेपर्यंत शांतपणे सहभाग नोंदविला. सायंकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर त्या मुलासोबत घरी परतल्या.
या दोन्ही घटना केवळ वैयक्तिक अनुभव नसून देशातील शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल व्हावा, विद्यार्थ्यांना न्याय्य संधी मिळावी आणि परीक्षांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, अशी समाजातील विविध घटकांची अपेक्षा अधोरेखित करतात. युवक-युवतींसह पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग हा शिक्षण व्यवस्थेबाबतची जागरूकता आणि उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट होत असल्याचे चित्र संविधान चौकात पाहायला मिळत आहे.
संविधान चौकात दिवसेंदिवस वाढणारी उपस्थिती हा केवळ आंदोलनाचा आकडा नसून, देशाच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्थेत विश्वासार्ह, पारदर्शक आणि सक्षम सुधारणा व्हाव्यात, अशी समाजाची सामूहिक अपेक्षा असल्याचा स्पष्ट संदेश या आंदोलनातून उमटत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी युवकांची मागणी आहॆ. रविवारी सुटी असल्याने आंदोलन स्थळी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जातं आहॆ.

Author: संतोष तायडे
संपादक











