माझ्या मानधनाचा प्रवास  – विवेक मोरे

मी माझ्या गद्यलेखनाचा प्रवास बबन कांबळेच्या सम्राटपासून केला. अगदी सुरवातीपासून बबनने मला दर आठवड्याचा काॅलम लिहण्याची प्रथम संधी दिली. पण फक्त संधी पुरेशी नसते. आपण जे काही लिहतो त्याला वाचकांची पसंतीही आवश्यक असते. तरच या संधीचं सोनं होतं. मला माहित नाही, पण मी जे काही लिहायचो ते वाचकांना पसंत पडलं असावं. आणि म्हणूनच बबनने मला कंटिन्यू केलं. जोवर बबनचा सम्राट वेगळा झाला नाही तोवर मी दर आठवडा सम्राटमध्ये लिहीत होतो. पण या लिहिण्याबद्दल मला बबनने एक रुपयाही मानधन दिले नाही. अर्थात आम्हीही कधी मानधनाची अपेक्षा ठेवली नाही. आपण जे काही लिहतोय ते प्रबोधनासाठी लिहतोय आणि त्याबद्दल आपल्याला पैसे मिळावेत ही अपेक्षा आम्हाला चुकीचीच वाटत होती. कारण हे सुध्दा आंबेडकरी चळवळीचच काम आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. त्यानंतर विश्वसम्राटमध्ये आम्ही लिहू लागलो. काही काळानंतर आर्थिक चणचणीमुळे विश्वसम्राट बंद पडला आणि मग सुनील खोब्रागडेंनी मला त्यांच्या महानायक मध्ये लिहण्यासाठी विचारणा केली. महानायकमध्ये दर शनिवारी माझे ‘पँथर अटॅक’ हे सदर नियमित सुरू झाले. हे सदर खुपच लोकप्रिय झाले. दर शनिवारी माझा फोन दिवसभर बिझी असायचा. कारण त्या दिवशी असंख्य वाचकांचे मला फोन यायचे. सलग चार, पाच वर्ष मी महानायकमध्ये लिहीत होतो. त्यानंतर नेहमीप्रमाणेच आर्थिक संकटामुळे महानायक सुध्दा मुंबईतून हद्दपार झाला. आणि माझा लेखनप्रवास थांबला. या सगळ्या प्रवासातही आम्ही एका पैशाचे मानधन घेतले नाही. दर आठवड्याचा पँथर अटॅक लिहायचा. तो फॅक्स करायचा. जर फॅक्स पोचला नाही तर रात्रीचा दिवस करून धावत, पळत तो घाटकोपरला महानायकच्या ऑफिसात द्यायचा. अशी सगळी धावपळ असायची. या धावपळीत वेळ, पैसा, स्टेशनरी स्वतःच्या खिशातून खर्च करायचो. पण आपण हे आंबेडकरी चळवळीसाठी करतोय, ही भावना समाधान देऊन जायची. असो. नंतर एंड्राॅईड मोबाईल आले. मग व्हाॅट्स ॲप, फेसबुकवर माझे लिखाण सुरू झाले. इथेसुध्दा लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळू लागला. आणि त्यामुळे पुन्हा एकदा लिहण्याची उमेद मिळाली. तर हा झाला माझा गद्य लेखनाचा हा प्रवास. आता माझ्या काव्यप्रवासाविषयी सांगतो.

आम्ही उठाव साहित्य मंचाची स्थापना केल्यानंतर माझ्या कानावर एक गोष्ट आली. ती म्हणजे आंबेडकरी चळवळीतील एक मोठा कवी त्याला समाजातून बोलावणे आले की तो त्यांना सांगायचा की, मी एक कविता म्हणायचे पाचशे रुपये घेतो. मी किती कविता म्हणायच्या हे तुम्ही ठरवा. तसेच माझ्या येण्या जाण्याचे टॅक्सी भाडे हे तुम्ही मला आधीच ॲडव्हान्स द्यायचे. हा कवी आजही हयात आहे. पण मला त्याचे नाव जाहीर करुन त्याची बदनामी करायची नाही. पण मला हे कळताच मी माझ्या सहकाऱ्यांसह एक मोठा निर्णय घेतला. म्हटलं, आता उठावची कविसंमेलने ही चार भिंतीत न राहता वस्तीपातळीवर होतील. मग आम्ही दर महिन्याला मुंबईतील एका वस्तीला भेट द्यायचो. आम्ही त्यांना म्हणायचो की, आम्हाला तुमच्या वस्तीत कविसंमेलन करायचे आहे. आम्हाला फक्त एक कळशी पाणी आणि तांब्या व माईकची व्यवस्था करा. आम्हाला मानधनाची गरज नाही. आमचा हा प्रस्ताव जवळ, जवळ सर्वच वस्त्यांनी मान्य केला. आणि आमची मुंबईतील झोपडपट्टीतील बुध्द विहारात दर महिन्याला कविसंमेलने होऊ लागली. यामुळे तीन परिणाम झाले. पहिलं म्हणजे मी वर उल्लेखिलेल्या धंदेवाईक कवीचा धंदा बंद झाला. दुसरा परिणाम हा की, मुंबईतून धंदेवाईक कव्वालांचे कार्यक्रम बंद होऊन तिथे उठावची कविसंमेलने होऊ लागली. आणि तिसरा परिणाम म्हणजे उठावचा डंका मुंबईच्या सिमा ओलांडून खेडोपाड्यात पोहोचून तिथूनही आम्हाला कविसंमेलनाची निमंत्रणे येऊ लागली.

तोवर मानधन कशाला म्हणतात याची आम्हाला तसूभरही जाणीव नव्हती. एकदा आम्हा चार कवींना घेऊन बाळ हरि झेंडे साहेबांनी ठाण्यातील श्रीनगरमध्ये एक कविसंमेलन घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांकडून आम्हा प्रत्येकाला एक पाकिट देण्यात आले. मी ते पाकीट उघडून पाहिले तर त्यात पंचवीस रुपये होते. याबद्दल मी झेंडेसाहेबांना विचारले तर ते म्हणाले हे तुमचं मानधन आहे. मी म्हटलं, पण हे कशासाठी? त्यावर झेंडेसाहेब म्हणाले, हा तुमचा प्रवास खर्च आहे. त्या काळात पंचवीस रुपये ही सुध्दा मोठी रक्कम होती. माझा भायखळा ते ठाणेचा प्रवास खर्च हा जेमतेम दहा, पंधरा रुपये झाला होता. पण एकदम पंचवीस रुपये म्हणजे फारच झालं होतं. पण झेंडे साहेबांच्या अत्याग्रहाने मला ते पाकिट खिशात ठेवावं लागलं. कवितेच्या मोबदल्यात घेतलेलं हे माझं पहिलं मानधन होय.

त्यानंतर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष विजय जाधव साहेब यांनी मला भायखळ्याच्या रेल्वेच्या पतसंस्थेच्या कार्यक्रमात कविता म्हणण्यास बोलावलं. मी तिथे माझ्या पाच, सहा कविता बोललो. कार्यक्रमानंतर जाधव साहेबांनीही मला एक पाकिट दिलं. मी उघडून पाहिलं तर त्यात चक्क दोन हजार रुपये होते. मी हे जाधव साहेबांना सांगीतलं. तर जाधव साहेब म्हणाले, ते चुकून दिलेलं नसून ते तुमचं हक्काचं मानधन आहे. मी म्हटलं, पण एवढे? त्यावर जाधव साहेब म्हणाले, आपल्या माणसांसाठी हे फार थोडं आहे.

आणि यानंतर मात्र अनेक मानधनाचे कार्यक्रम येऊ लागले. समोरुन विचारणा व्हायची की, तुमचे मानधन किती? अशावेळेस माझी जीभ जड व्हायची. मला अनेक जण सांगायचे की, अमूक तमुक फलाणा शाहीर आपले मानधन पन्नास हजार घेतो. ते ऐकून छाती दडपून जायची. आजही मला कोणी मानधन किती, असं विचारलं की, माझी बोबडी वळते. अनेक मित्र मला सांगतात की, पाच हजार सांगा, दहा हजार सांगा. पण हे सांगण्याची माझी छाती होत नाही. मी आपुलकीनं त्यांना सांगतो की, तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. आणि नाही दिले तरी चालेल. मी कार्यक्रमाला नक्की येईन. माझ्या या स्वभावामुळे माझे मित्र मला नेहमीच दोष देतात. पण आपले असे भरमसाठ मानधन सांगण्यासाठी माझी जीभच रेटत नाही, त्याला मी तरी काय करणार? काल सी वुड मध्ये राम झेंडेंनी माझ्या कवितेचा कार्यक्रम ठेवला होता. तिथेही मला मानधनाचे पाकिट मिळाले की, जे मी सहसा कधीच उघडून पाहत नाही. घरी आल्यावर मी पाकिट उघडले तेंव्हा समजले की, त्यात पाचशेच्या दोन नोटा म्हणजेच एक हजार रुपये आहेत. हे एवढेच मानधन का म्हणून मी अजिबात नाराज नाही. राम झेंडेंनी मला मानधन न देताही जरी बोलावले असते तरी मी तेथे आवर्जून गेलो असतो. कारण मला मानधनापेक्षा तिथली माझी माणसे महत्वाची आहेत. कविता करणं हा आमचा धंदा नसून ते आमचं आंबेडकरी मिशन आहे. त्यासाठी मानधन हा विषयच आम्ही दुय्यम मानतो. या आंबेडकरी मिशनसाठी तुम्ही आम्हाला कसलंही मानधन न देता जरी बोलावले तरी आम्ही आवर्जून तेथे येऊ हा आमचा शब्द आहे.

तर सांगायचा मुद्दा हा की, कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करतानाचा पंचवीस रुपयापासून सुरू झालेला तीस पस्तीस वर्षाचा हा मानधनाचा प्रवास एक हजारापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात धन जरी फारसं मिळालं नाही. मात्र मान प्रचंड मिळाला आहे. ही सुध्दा आंबेडकरी जनतेकडून मिळालेली पोचपावतीच आहे. आता काल मिळालेल्या हजार रुपयात माझा वरळीपासून ते सी वुडचा प्रवास खर्चच चारशे रुपये झाला. हे मी कालच्या सी वुडच्या कार्यक्रमाविषयी अजिबात बोलत नाही. कारण त्यांनी दिलेलं मानधन हे माझ्या प्रवासखर्चाच्या दुप्पट होतं. मला सार्वत्रिकरित्या हे म्हणायचे आहे की, जो वक्ता इतक्या लांबून आपणाकडे एक निखळ आंबेडकरवाद सांगायला येतो त्याचा यथोचित सन्मान जाऊद्या पण निदान त्याचा प्रवास खर्च तरी आपण द्यायलाच हवा.

इथे मला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. बाबरी पडल्यानंतर मुंबईमध्येसुध्दा हिंदू, मुस्लिम दंगली सुरू झाल्या. काही काळानंतर हे वादळ शमले. आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कुर्ल्याच्या कसाई वाड्यात आमच्या उठावचं कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कविसंमेलनात दंगलीच्या पार्श्वभूमीवर रमेशने लिहलेली एक पात्रटिका खुपच दाद घेऊन गेली. त्या कविसंमेलनात अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. रमेशची पात्रटिका अशी होती…….,

हिंदूंचा वडा आणि मुसलमानांचा पाव,

मग कशासाठी जाळायची…..

आपलीच वस्ती आणि आपलाच गाव!

याच ठिकाणी दुसर्‍या दिवशी त्यावेळचा अत्यंत प्रसिद्ध असलेला ‘बाबला’ चा आर्केस्ट्रा होता. रात्री एक वाजता आम्ही कार्यक्रम संपवला. आयोजकांनी जाताना आमच्या हाती सगळ्यांना मिळून एकच पाकिट दिलं. कुर्ला स्टेशनला आल्यावर आम्ही पाकिट उघडून पाहिली तर त्यात अवघे तीस रुपये. आम्ही चार कवी हे तीस रुपये कसे वाटून घेणार, हा आम्हाला गहन प्रश्न पडला. अखेर सर्वसंमतीने आम्ही दुसर्‍या दिवशी ते पाकीट चैत्यभूमीच्या दानपेटीत टाकले. प्रश्न हा आहे की ते जयंती मंडळ बाबलासारखा महागडा आर्केस्ट्रा बोलवू शकतो पण आंबेडकरी विचारांचं प्रबोधन करणाऱ्या कविंना साधं गाडीभाडं देऊ शकत नसेल तर ह्याला कपाळकरंटेपणा नाही म्हणावं तर काय म्हणावं.

शेवटी एवढच म्हणावेसे वाटते की, मित्रांनो कविता करणे हा आमचा धंदा नाही. जे धंदा करत असतील त्यांचा त्यांना लखलाभ असो. पण आम्ही धंदेवाईक नव्हे तर आंबेडकरी चळवळीतील कवी आहोत. आम्हाला तुमच्या गलेलठ्ठ मानधनाची अजिबात अपेक्षा नाही. आम्हाला तुमच्याकडून हवा आहे तो फक्त यथोचित मान. तो जर मिळाला तर पुन्हा एकदा आपल्या चळवळीत वामनदादा कर्डक, लक्ष्मण दादा केदार, श्रावण यशवंते, प्रतापसिंह बोदडे यासारखे अनेक प्रतिभावंत जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. तुर्तास एवढेच.

– विवेक मोरे – मुंबई 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More