मुक्या जनावरांची क्रूर कोंडी! २८ गोवंशांची सुटका; मौदा पोलिसांचा तस्करांवर घाव

– आयशर वाहनासह दोन आरोपी ताब्यात, गोवंशांची गोशाळेत रवानगी

The Exposer
नागपूर : भंडारा ते नागपूर महामार्गावरून अवैधरित्या गोवंशांची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध मौदा पोलिसांनी धडक कारवाई करत २८ गोवंशांची सुटका केली. जनावरांना वाहनात अत्यंत निर्दयीपणे कोंबून, दोरखंडाने बांधून तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. या कारवाईत आयशर वाहनासह एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौदा पोलीस ठाण्याचे पथक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून गोवंश तस्करीची माहिती मिळाली. भंडारा-नागपूर रोडवरील माथणी शिवारातील टोल नाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना संशयित आयशर वाहन क्रमांक CG/04/PE/6582 पोलिसांनी अडवून तपासणी केली.

वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल २८ गोवंश अत्यंत दाटीवाटीने कोंबलेले आढळले. जनावरांना आखूड दोरखंडाने बांधण्यात आले होते. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था नसल्याने मुक्या जनावरांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या होणाऱ्या हालअपेष्टांचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या कारवाईत आयशर वाहनाची किंमत १२ लाख रुपये, २८ गोवंशांची अंदाजे किंमत २ लाख ८० हजार रुपये आणि दोन आरोपींचे मोबाइल फोन मिळून २० हजार रुपये, असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना योग्य देखभाल व संगोपनासाठी गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात पिंटू रामकिशन मेहरा (वय ३२, रा. वृंदावन कॉलनी, इंदूर, मध्य प्रदेश; मूळ रा. रायपूर, छत्तीसगड) आणि मोहम्मद अली इरशाद अहमद (वय २४, रा. कामगार नगर, कमर कॉलनी, नागपूर) यांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

तस्करीच्या साखळीचा छडा लागणार का?

२८ गोवंशांची एका वाहनातून अशा प्रकारे वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, जनावरे नेमकी कुठून आणली होती आणि ती कुठे नेली जात होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ वाहन आणि आरोपींपुरती कारवाई मर्यादित न राहता या अवैध वाहतुकीच्या संपूर्ण साखळीचा छडा लावण्याची गरज आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस ठाणेदार भारत लसंतेंच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात डी.बी. पथकातील सपोनि राहुल किटे तसेच पोलीस अंमलदार संदीप कडू, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, शैलेश बिनझाडे आणि शिवाजी दिढे यांचा सहभाग होता.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More