यशोधरानगर पोलिसांची धडक कारवाई! वाहनचोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur Yashodharanagar Police vehicle theft case three stolen two-wheelers seized

– १८ वर्षीय आरोपीला ताब्यात; यशोधरानगर, हुडकेश्वर, सदर आणि इमामवाडा पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा तपास

The Exposer
नागपूर : शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनचोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १८ वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यशोधरानगर पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत चोरीची तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, आरोपीकडून घरफोडीचा एक गुन्हाही उघडकीस आण्यात यश आले.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरानगर पोलिस ठाण्यात दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच, घरफोडीच्या एका गुन्ह्याचीही उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत यशोधरानगर, हुडकेश्वर, सदर आणि इमामवाडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील वाहनचोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई परिमंडळ क्रमांक ५ चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलिस आयुक्त रोहित ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यशोधरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस चाँद शेख यांच्या नेतृत्वाखाली संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून चोरीची वाहने हस्तगत करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. आरोपीची इतर गुन्ह्यांतील संभाव्य भूमिका आणि चोरीच्या वाहनांबाबत पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More