सुरेल आवाजांचा अनोखा संगम! नागपुरातील गुणी गायक-गायिकांचा ‘खुशी सुरसंगम’तर्फे गौरव

– जुन्या–नव्या हिंदी–मराठी सदाबहार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध; विदर्भ साहित्य संमेलन अर्पण हॉलमध्ये रंगला अविस्मरणीय संगीत सोहळा!

The Exposer
नागपूर : जुन्या आणि नव्या हिंदी-मराठी चित्रपटगीतांचा ठेवा, सुरेल आवाजांची जादू आणि संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा आनंदमय वातावरणात ‘खुशी सुरसंगम लोककला बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने आयोजित संगीत मैफलीत नागपूरच्या गुणी गायक-गायिकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. मोरभवन येथील विदर्भ साहित्य संमेलन अर्पण हॉलमध्ये हा संगीत सोहळा उत्साहात पार पडला.

या मैफलीत महिला गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांची मने जिंकली. मनिषा ताई, डॉ. ममता ताई, डॉ. संयुक्ता ताई, रंजना ताई, शर्मिला ताई, सुरभी ताई, अनुश्री ताई, आशा ताई, शालिनी ताई, कांचन ताई, विद्या ताई आणि समीक्षा ताई यांनी एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण केले. त्यांच्या गायनाला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.

विशेष म्हणजे, ‘तुमसे बना मेरा जीवन’, ‘अगर आसमां तक मेरे हाथ जाते’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘गुम है किसी के प्यार में’, ‘तू येशील का’, ‘सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था’, ‘ही नवरी असली’ आणि ‘जब कोई बात बिगड़ जाये’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी मैफलीत जुन्या सुवर्णकाळातील संगीताच्या आठवणींना उजाळा मिळाला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजवीर सिंह सर उपस्थित होते. खुशी सुरसंगमचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश उके सर आणि संयोजक प्रदीप फुलझेले सर यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संचालिका सौ. त्रिशिला प्रदीप फुलझेले यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.

संस्थेचे संचालक व आयोजक प्रदीप फुलझेले यांच्या पुढाकारातून सहभागी गायक-गायिकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीना ताई नगरारे, संयोजक प्रदीप फुलझेले आणि सचिव सौ. त्रिशिला फुलझेले यांनी कलाकारांचे अभिनंदन केले. संगीत क्षेत्रातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या संगीत मैफलीत डॉ. प्रकाश उके, राहुल वानखेडे, दिनेश शेलारे, अनिल तामगाडगे, गिरीधारी लुटे, सुधाकर बनसोड, प्रशांत वरले, मनोज झुके, कुणाल माहुलकर, डॉ. शैलेश मेघाम, राजेंद्र मेघाम, नरेश भगत आणि विजय वानखेडे यांनीही लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून मैफलीत रंगत आणली.

सुरेल आवाजांचा सन्मान, नवोदित व हौशी कलाकारांना प्रोत्साहन आणि जुन्या-नव्या संगीताचा सुंदर मिलाफ अशा त्रिवेणी संगमामुळे ‘खुशी सुरसंगम’ची ही मैफल रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More