– नगरसेविका निधी तेलगोटे यांच्या पुढाकारातून प्रभाग ३७ मध्ये दिव्यांग भगिनींसाठी विशेष उपक्रम; ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
The Exposer
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत आयोजित ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ या उपक्रमाची प्रभाग क्रमांक ३७ मध्ये आगळीवेगळी आणि भावस्पर्शी सांगता झाली. टेलिकॉम नगर गार्डन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सौ. कांचनताई नितीन गडकरी यांनी दिव्यांग महिलांच्या हातांवर स्वतः मेहंदी रेखाटून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे केले.

नागपूर महानगरपालिकेच्या विधी समिती सभापती तथा नगरसेविका कु. निधी मिनाक्षी नितीन तेलगोटे यांच्या पुढाकारातून दिव्यांग महिलांसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसमावेशकता, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कांचनताई गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवामागील नितीनजी गडकरी यांची संकल्पना स्पष्ट केली. या महोत्सवाच्या माध्यमातून सुमारे १,६०० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन करण्याचे कामही होत आहे. महिलांना एकत्र येऊन संवाद साधण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आपले कौशल्य सादर करण्याची संधी या उपक्रमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका निधी तेलगोटे म्हणाल्या की, ‘माझा प्रभाग, माझा परिवार’ या संकल्पनेतून प्रभागातील विकासकामांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाते. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण होते, परस्पर संवाद वाढतो आणि प्रभागरूपी कुटुंबातील नाती अधिक घट्ट होतात. दिव्यांग भगिनींनाही या उत्सवाचा आनंद घेता यावा आणि त्यांचा उत्सवातील सहभाग अधोरेखित व्हावा, या भावनेतून विशेष आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग महिलांच्या हातांवर कांचनताई गडकरी यांनी स्वतः मेहंदी रेखाटण्याचा प्रसंग उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने सहभागी करून घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला सौ. कांचनताई नितीन गडकरी, दिव्याताई धुर्दे, प्रगतीताई पाटील, नंदाताई जिचकार, मनीषाताई काशिकर, वर्षाताई चौधरी, वंदनाताई शर्मा आणि स्वप्नाताई हिरणवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सदस्य, दिव्यांग आघाडीचे प्रतिनिधी आणि टेलिकॉम नगर परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषाताई काशिकर यांनी केले. दिव्याताई धुर्दे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर स्वप्नाताई हिरणवार यांनी आभार मानले.
दिव्यांग महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, हातांवरील मेहंदीचा सुगंध आणि सामाजिक समावेशाचा संदेश अशा वातावरणात ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ या उपक्रमाची संस्मरणीय सांगता झाली.
Author: संतोष तायडे
संपादक















