सह्याद्रीच्या रक्षणासाठी नागपुरातून रणशिंग! अभिनेता सयाजी शिंदे फुंकणार आंदोलनाचा बिगुल

– सोमवारी दुपारी ४.३० वाजता ‘पर्यावरणासाठी थाळी बजाव’ आंदोलन
– सह्याद्रीतील लाखो वृक्षांच्या संभाव्य कत्तलीला विरोध; अजनीवन बचावाच्या लढ्यालाही मिळणार नवे बळ

The Exposer
नागपूर : सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत प्रस्तावित पंप स्टोरेज वीज प्रकल्पाच्या नावाखाली लाखो वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याच्या प्रस्तावाविरोधात आता पर्यावरणप्रेमींचा आवाज बुलंद होणार आहे. या वृक्षतोडीविरोधातील राज्यव्यापी लढ्याचे रणशिंग ज्येष्ठ अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी नागपुरातून फुंकले जाणार आहे. संविधान चौकात होणाऱ्या ‘पर्यावरणासाठी थाळी बजाव’ आंदोलनातून सह्याद्रीच्या रक्षणासाठी नागपूरकर एकजुटीने एल्गार पुकारणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकर परिसरात प्रस्तावित पंप स्टोरेज वीज प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे सुमारे एक लाख झाडे तोडली जाण्याची भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून, निसर्गसंपदेच्या रक्षणासाठी राज्यभरातून विरोध तीव्र होत आहे. या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी सयाजी शिंदे पुढाकार घेत असून, सोमवारी दुपारी ४.३० वाजता संविधान चौकात आंदोलन होणार आहे.

या आंदोलनात नागपूरमधील शेकडो पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गसंवर्धनासाठी काम करणारे नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती अनसूया काळे-छाबरानी यांनी दिली. सयाजी शिंदे यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या आंदोलनातील सहभाग जाहीर केला आहे. नागपुरातील आंदोलनानंतर ते राज्यभर दौरा करून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करणार आहेत.

सह्याद्रीसोबत अजनीवनच्या लढ्यालाही मिळणार बळ!

सह्याद्रीच्या रक्षणासाठी सुरू होणाऱ्या या आंदोलनामुळे नागपुरातील अजनीवन वाचविण्याच्या लढ्यालाही नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास अनसूया काळे-छाबरानी यांनी व्यक्त केला. यापूर्वी अजनीवन परिसरातील प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशन (आयएमएस) प्रकल्पामुळे ४० हजारांहून अधिक झाडे तोडली जाण्याची शक्यता होती. या विरोधात पर्यावरणप्रेमींनी सलग चार ते पाच महिने आंदोलन छेडले होते. त्यानंतर हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला होता.

मात्र, आता अजनी रेल्वे स्थानकाच्या विस्ताराच्या नावाखाली अजनीवन परिसरातील एक हजारांहून अधिक झाडे महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता गुपचूप तोडण्यात आल्याचा आरोप छाबरानी यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर उद्यान विभागाने पुन्हा वृक्षतोडीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विकासाच्या नावाखाली वृक्षतोड किती काळ सहन करायची?

&एकीकडे सह्याद्रीतील वृक्षसंपदेवर संकट घोंगावत असताना दुसरीकडे नागपुरातील अजनीवनातील झाडांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सह्याद्री असो वा अजनीवन, विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी होऊ नये, ही भूमिका घेऊन पर्यावरण कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत आहेत. सह्याद्रीच्या आंदोलनाला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा आणि अजनीवन वाचविण्याच्या लढ्यालाही बळ द्यावे, असे आवाहन अनसूया काळे-छाबरानी यांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More