– गुन्हे शाखेचा मारला होता छापा; ८७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त; यशोधरानगर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
The Exposer
नागपूर : शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवायांचा धडाका सुरू असल्याचे चित्र असले, तरी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ऋतुराज टाउन परिसरात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या घरफोडीविरोधी पथकाने १४ ऑक्टोबर रोजी छापा टाकत आठ जणांना अटक केली होती. मात्र, या कारवाईनंतर आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की, हा जुगार अड्डा नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता?
आठ जणांना अटक, ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेच्या घरफोडीविरोधी पथकाने यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव येथील ऋतुराज टाउनमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. यावेळी जुगार खेळताना आढळलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, सात मोबाईल, ताशपत्ते व अन्य साहित्य असा एकूण ८७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात विनीत विनोद मेहरुनिया, शाहारुख असारी, अस्मित रितेश चरोटे, राहुल अशोक धामती, कुणाल ऊर्फ गोलू अशोक धामती, अश्विन तलाराम गवारे, अरुण राम कुशवाह आणि प्रतीक संतोष सानपणे या आठ जणांना अटक करण्यात आली होती.
स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
जुगार अड्डा हा एखाद्या निर्जन ठिकाणी अचानक सुरू झालेला प्रकार नसतो. अशा ठिकाणी लोकांची ये-जा, पैशांची उलाढाल आणि नियमित हालचाली सुरू असतात. मग यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अड्डा सुरू असताना स्थानिक पोलिसांच्या नजरेस तो कसा पडला नाही? याची माहिती पोलिसांना होती का? असल्यास यापूर्वी कारवाई का झाली नाही? गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना अटक केली, ही कारवाई महत्त्वाची असली तरी जुगार अड्डा चालविण्यामागील मुख्य सूत्रधार कोण, त्याला कुणाचे अभय होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. जुगार खेळताना पकडलेल्या आठ जणांवर कारवाई झाली; मात्र जुगार अड्डा रुपी अवैध धंद्याला कथित संरक्षण देणारे लोक तपासाच्या कक्षेत आले आहेत का? हा खरा तपासाचा विषय आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















