एसबीआयला ७३.८२ कोटींचा गंडा! शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलणारे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

– मौदा आणि रामटेक शाखांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर; बंगळुरू व जबलपूरमधून तीन आरोपी अटकेत, आतापर्यंत १८ जणांवर गुन्हे दाखल

The Exposer
नागपूर : शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) मौदा आणि रामटेक शाखांना तब्बल ७३.८२ कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट कागदपत्रे, खोटे वेअरहाऊस परवाने आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून कोट्यवधींचे कृषी कर्ज हडप करणाऱ्या या रॅकेटमधील तीन आरोपींना बंगळुरू आणि जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शासकीय मदतीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना जाळ्यात ओढले!

या टोळीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अशिक्षित शेतकऱ्यांना लक्ष्य केले होते. दरवर्षी मिळणाऱ्या १० हजार रुपयांच्या शासकीय मदतीचे आमिष दाखवून आरोपी शेतकऱ्यांना बँक खाते उघडण्याच्या बहाण्याने आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सातबारा उताऱ्यासारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळवत होते. त्यानंतर इंग्रजीतील कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन त्यांच्या नकळत लाखो रुपयांचे कृषी कर्ज मंजूर करून घेतले जात होते.

बनावट वेअरहाऊस परवाने; ७३.८२ कोटींचा कर्जघोटाळा!

या घोटाळ्यात एसबीआयच्या मौदा शाखेतून ५४.६९ कोटी रुपये, तर रामटेक शाखेतून १९.१३ कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. यासाठी केंद्रीय वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेटरी अथॉरिटीचे बनावट परवाने आणि ई-एनडब्ल्यूआरचा वापर करण्यात आला. एसबीआयच्या प्रोड्यूस मार्केटिंग लोन (पीएमएल) योजनेंतर्गत मंजूर झालेली कोट्यवधींची रक्कम बनावट कंपन्यांच्या बँक खात्यांत वळवून हडप करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

कर्नाटकातही फसवणुकीचे गुन्हे

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मदन गोपाल मल्लिकार्जुन पाटील (बंगळुरू), प्रियरंजन अशोक कुमार चौधरी ऊर्फ गौरव मिश्रा आणि राहुल ऊर्फ संदीप सतीश दुबे (दोघेही जबलपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. यातील प्रमुख आरोपी प्रियरंजन चौधरी याच्याविरुद्ध कर्नाटकातही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या आंतरराज्यीय टोळीतील फरार आरोपींचा शोध सुरू असून, तपासादरम्यान आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More