कापसी नाक्यावर ANTF चा ‘सर्जिकल स्ट्राइक’! ४० किलो गांजासह ४७.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त; लातूरचे तिघे अटकेत

– कलकत्ता ढाब्यासमोर ट्रकवर छापा; नागपूर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई

The Exposer
नागपूर : शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नागपूर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) मोठी कारवाई करीत कापसी नाका परिसरात तब्बल ४० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त केला. कलकत्ता ढाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून हा गांजा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत गांजासह ट्रक आणि दोन मोबाईल असा एकूण ४७ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ANTF नागपूर येथे कार्यरत पोलीस शिपाई अंकुश गजभिये यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कापसी नाका येथील कलकत्ता ढाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH 45 AF 8177 मध्ये गांजाचा साठा आणण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने NDPS कायद्यातील तरतुदींचे पालन करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी आरोपी क्रमांक एक गुंडेराव नारायण तोंडारी हा चालवत असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकमध्ये ४० किलो ३९० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजा, ट्रक आणि दोन विवो कंपनीचे मोबाईल जप्त केले.

या प्रकरणात गुंडेराव नारायण तोंडारी (वय ३९), नामदेव बळीराम रोडे (वय ३७) आणि राजू तेजेराव सुरणर (वय ३९), तिघेही रा. अहमदपूर, जि. लातूर यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात गांजा ४० किलो ३९० ग्रॅम – २० लाख १९ हजार ५०० रुपये, टाटा कंपनीचा ट्रक – २७ लाख रुपये, विवो कंपनीचे दोन मोबाईल – २५ हजार रुपये, असा एकूण ४७ लाख ४४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर, PSI टिपुर्णे, ASI विजय कडू, पोलीस हवालदार प्रशांत सलाम, पोलीस हवालदार गयाप्रसाद वर्मा, मृदुल नागरे, पोलीस शिपाई अंकुश गजभिये, आशिष फाळे, चेतन चौधरी, गोविंद इधाते, पंकज चवरे, किशोर टोंगे आणि मंगेश सरपटे यांच्या पथकाने केली.

लातूरमधून नागपुरात गांजाची खेप कोणासाठी आणली?

या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९१/२६ अन्वये NDPS कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ नुसार दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.१४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमधून नागपुरात गांजाची खेप नेमकी कोणासाठी आणली होती? या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे सक्रिय आहे का? या दिशेने तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ANTF ने केलेली ही कारवाई तस्करांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More